“जर काही चूक केली तर माझ्या घराची पायरी चढू नका”; अजितदादांनी कार्यकर्त्यांना दरडावलं

“जर काही चूक केली तर माझ्या घराची पायरी चढू नका”; अजितदादांनी कार्यकर्त्यांना दरडावलं

Ajit Pawar Speech : बारामती मतदारसंघात राजकीय वातावरण आता चांगलंच ढवळून निघत आहे. सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवार स्वतः मैदानात उतरले आहेत. तर महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार स्वतः प्रचारात गुंतले आहेत. अजित पवार यांनी आज बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथे प्रचार सभा घेतली. या प्रचारसभेत अजितदादांचा पारा चढलेला दिला. त्यांनी करड्या शब्दांत कार्यकर्त्यांना चांगलंच दरडावलं. माझ्याबाबतीत जर काही चूक केली तर पुन्हा माझ्या घराची पायरी चढायची नाही असा सज्जड दम भरला. त्यांच्या या भाषणाची जोरदार चर्चा आता सुरू झाली आहे.

बारामतीत कुठली कंपनी आणली सांगा, मग बाकी बोला; रोहित पवारांचा अजितदादांना टोला

या सभेत अजित पवारांनी त्यांच्या एका जुन्या वक्तव्याची आठवण करून दिली. मी काही वर्षांपूर्वी धरणाबाबत एक वक्तव्य केलं होतं. त्याचा मोठा फटका मला बसला. आता जर तुम्ही माझ्याबाबतीत काही चूक केली तर पुन्हा घराची पायरी चढू नका. काहीजण मी आलो की माझ्याबरोबर असतात. दादाला दिसावं म्हणून अगदी पुढं असतात. दादाची पाठ फिरली की दुसरे आले की लगेच त्यांच्याबरोबर. अरे काय चाललंय तुमचं. एकाचं तरी कुंकू लावा. एकतर माझं लावा नाहीतर त्यांचं तरी लावा. हा काय लावलाय चाटाळपणा. या गोष्टी झाकून राहत नाहीत.

माझे जे कार्यकर्ते आहेत. ज्यांना मी पदं दिली. ज्यांना मानसन्मान दिला. त्या कार्यकर्त्यांपैकी जर कुणी चुकला तर अजित पवाराशी गाठ आहे सांगून ठेवतो. आता चुका पण परत आपली पायरी चढायची नाही. ज्यांना दूध संघाचा संचालक केलं. खरेदी विक्री संघात पदं दिली त्यांनी आता ठरवावं की आपल्याशी कसं वागायचं ते अशा शब्दांत अजित पवारांनी भरसभेत कार्यकर्त्यांना चांगलंच खडसावलं.

बँकेच्या निवडणुकीतही गंमत झाली पण त्यावेळी मी फार मनावर घेतलं नाही. कुणी कुणी केली हे मला चांगलंच माहिती आहे, कारण ती यादी नंतर माझ्याकडेच आली होती. ते जाऊ द्या. ती सहकारी निवडणूक आहे त्यात पक्षीय राजकारण नसतं. पण आता जर कुणी हे भाषण ऐकून म्हटलं बघा अजितदादा द्यायला लागले अरे पण मी माझ्या कार्यकर्त्यांना दम देतोय तुमच्या का पोटात दुखतंय, असा सवाल करताच उपस्थितांत हशा पिकला.

‘कचा-कच बटना’वरुन नवा वाद; ‘अजित पवार व्यापारीच’ विरोधक बरसताच दादांचं स्पष्टीकरण, म्हणाले..

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube