अमितभाईंच्या मनातलं काम महाराष्ट्रात करून दाखवणारच!; फडणवीसांनी अजितदादांसमोरच दिला शब्द
Devendra Fadnavis : सहकार विभागाच्या पोर्टलचं उद्घाटन अमित शाह दिल्लीत करू शकले असते. गुजरातमध्येही करू शकले असते. पण महाराष्ट्र सहकाराची पंढरी आहे. म्हणून अमित भाईंनी महाराष्ट्र आणि त्यातही पुणे जिल्हा निवडला. त्यासाठी मी आभार मानतो. ग्रामीण भागातील विविध कार्यकारी सोसायट्या पुनर्जिवीत करण्याचं काम आता अमित शाह यांनी हाती घेतलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मल्टीपर्पज अॅग्री बिजनेस सोसायटीचे पहिले मॉडेल आम्ही महाराष्ट्रात निर्माण करून दाखवू. हे मॉडेल देशभरात घेऊन जाऊ, जे तुमच्या (अमित शाह) मनात आहे, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
केंद्रीय सहकार संस्था निबंधक कार्यालयच्या डिजिटल पोर्टलचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज पुण्यात करण्यात आले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, पुणे जिल्ह्याचे चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.
Chandrayaan-3: चांद्रयान-3 चा चंद्राच्या कक्षेत यशस्वी प्रवेश
फडणवीस पुढे म्हणाले, सहकार मंत्रालयाचे कामकाज हाती घेतल्यानंतर अमित शाह यांनी त्यामध्ये वेगाने बदल केले. आयकर संदर्भात प्रतिनिधी दिल्लीला जायचे आणि रिकाम्या हाताने परत यायचे. मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वात आम्ही प्रतिनिधी मंडळ घेऊन शेतकऱ्यांवरील इनकम टॅक्ससंदर्भात शाहांना भेटलो. शाह म्हणाले शेतकऱ्यांना जास्त पैसे द्यायचे म्हणून इनकम टॅक्स लावायचा हे अतिशय चुकीचे आहे. हे मोदींजींच्या राज्यात मी चालू देणार नाही. त्यांनी हा इनकम टॅक्स रद्द तर केलाच शिवाय आधी ज्यांनी भरला होता तोही अॅडजेस्ट केला. हे काम कठीण होतं पण, अमित शाहांनी करून दाखवलं. कारण, त्यांचंही नेतृ्त्व सहकारातून घडलं आहे. त्यामुळे त्यांनी मार्ग काढत हा कर रद्द केला, असे फडणवीस म्हणाले.
अमितभाईंची फॅक्ट्री महाराष्ट्रातच होती
अडचणीत असलेल्या कारखान्यांना एनसीडीसीच्या माध्यमातूनही मदत केली. शाहांचं महाराष्ट्रावर जास्त प्रेम आहे कारण ते महाराष्ट्राचे जावई आहेत, असे अजितदादा म्हणाले. हे खरंच आहे. पण आणखी पुढे सांगतो की त्यांचा जन्म मुंबईतला आहे म्हणजे त्यांची ही कर्मभूमी सुद्धा आहे. त्यावेळी राजकारण नसताना फॅक्ट्री चालवत होते ती फॅक्ट्री देखील महाराष्ट्रातच होती.