“आंदोलनाला फक्त एक दिवसाची परवानगी देऊन मुख्यमंत्र्यांनी..”, जरांगेंचा फडणवीसांना रोखठोक इशारा

Manoj Jarange Press Conference : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या (Manoj Jarange Patil) दिशेने निघाले आहेत. जरांगे पाटील आता जुन्नर येथे (Maratha Reservation) दाखल झाले आहेत. यानंतर त्यांनी किल्ले शिवनेरी येथे पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना इशारा आणि शब्दही दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणत्याही मराठा आंदोलकाला मुंबईत जाण्यापासून रोखणार नाहीत. ते मराठा समाजाच्या वेदना समजून घेतील अशी अपेक्षा आहे. मात्र एक दिवसाची परवानगी देऊन त्यांनी समाजाची चेष्टा केली आहे. जर समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर येणारे दिवस त्यांचं राजकारण बरबाद करणारे असतील असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
..तर समाज फडणवीसांना डोक्यावर घेईल
जरांगे पुढे म्हणाले, एक दिवसाची परवानगी देऊन फडणवीसांना असं दाखवायचं होतं की मी तर परवानगी दिली आहे यात माझी काय चूक. पण राज्यात यातून वेगळाच संदेश गेला. आधी तुम्ही कोर्ट कोर्ट करत होता पण पोलिसांनी परवानगी दिली म्हणजे यातून स्पष्ट झाले की परवानग्या या सरकारकडेच आहेत. तुम्ही जाणूनबुजून एक दिवसाची परवानगी दिली यामुळे समाजात नाराजीची लाट उसळली आहे. तुम्ही मोठं मन दाखवून गोरगरिबांच्या वेदना लक्षात घ्या. आमच्या मागण्या मान्य करा. समाज कायमस्वरूपी तुम्हाला डोक्यावर घेईल असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
ब्रेकिंग! मुंबईत धडकण्याआधीच मनोज जरांगेंचं पोलिसांना हमीपत्र; 20 आश्वासने नेमकी कोणती?
मराठा आरक्षणाच्या मु्द्द्यावर जरांगे पाटील म्हणाले, तुम्ही आमची मराठा आरक्षणाची मागणी मान्य करा. हेच मराठे गुलाल टाकून मरेपर्यंत तुम्ही दिलेल्या आरक्षणाते उपकार विसरणार नाहीत. अजूनही फडणवीसांच्या हातून वेळ गेलेली नाही. त्यांच्याकडे संधीचं सोनं करण्याची वेळ आहे. तुम्ही काही आमचे शत्रू नाहीत. फक्त तुमची आडमुठी आणि मराठाविरोधी भूमिका सोडा. मोकळ्या मनानं वागा. गरीब मराठ्यांची मनं जिंका. मराठे तुम्हाला कधीच विसरणार नाहीत असे सांगत तुम्ही आम्हाला गोळ्या घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
एक दिवसाची परवानगी देऊन मुख्यमंत्र्यांनी..
राज्य सरकारने आझाद मैदानावर आंदोलनासाठी फक्त एकाच दिवसाची परवानगी दिली आहे. या निर्णयावर जरांगे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. फक्त एक दिवसाची परवानगी देऊन समाजाची एक प्रकारे चेष्टाच केली आहे. असं असेल तर त्यांनी आता या एका दिवसात आमच्या मागण्या मान्य कराव्यात. प्रत्येकानेच आझाद मैदानात येण्याचा अट्टाहास करू नका. काही लोकं आधी येतील काही नंतर येतील. आपल्याला फक्त आरक्षण मिळण्याशी मतलब आहे. मग ते पाच हजार लोक आल्याने मिळू नाहीतर कितीही लोकांच्या आंदोलनाने मिळो त्याच्याशी आपल्याला देणंघेणं नाही असेही मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.