मराठी साहित्ययात्री संमेलनाचा दिमाखात शुभारंभ! ढोल-ताशांच्या गजरात दुमदुमले रेल्वेस्थानक

Marathi Sahityayatri Sammelan begins at railway station : सरहद, पुणे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे दिल्ली येथे 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या निमित्त मराठी साहित्ययात्री संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे ते दिल्ली प्रवासादरम्यान फिरत्या चाकांवर हे प्रवासी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाचे उद्घाटन आज (दि. 19) मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत होते.
पारनेर, नगरकरांचा प्रवास होणार सुखद! पुणे-शिरुर उड्डाणपुलाच्या कामास लवकरच सुरूवात…
त्यावेळी डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिका डॉ. संगीता बर्वे उपस्थित होते. सुरुवातीस शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताच्या सादरीकरणाने रेल्वे स्टेशन परिसर दुमदुमून गेला होता. प्रत्येकात चैतन्याची भावना निर्माण झाली होती. पंढरपूर येथून आलेल्या ग्रंथ दिंडीचे या वेळी स्वागत करण्यात आले. ही दिंडी रेल्वेद्वारे दिल्लीकडे निघाली आहे. या मराठी साहित्ययात्री संमेलनादरम्यान उदय सामंत यांनी रेल्वेतून प्रवास करत साहित्यिक, साहित्यप्रेमी आणि पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना मराठी भाषा मंत्री उदय सामंत म्हणाले की, बाराशे साहित्यिक व साहित्यप्रेमी एकत्र येऊन संमेलनानिमित्त प्रवास करणे हा जागतिक विक्रम आहे. चार साहित्यिक एकत्र आल्यावर चांगले विचार ऐकायला मिळतात. तसेच अनेक वाद देखील होऊ शकतात, पण सकारात्मक विचार करता वाद हे जीवंतपणाचेच लक्षण आहे, हे जाणवते. साहित्यिक म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती आहे. या संस्कृतीची जपणूक या संमेलनानिमित्ताने होत आहे. असे प्रतिपादन केले. मराठी साहित्ययात्री संमेलनाचे अध्यक्ष शरद तांदळे, कार्यकारी अध्यक्ष वैभव वाघ, कार्याध्यक्ष शरद गोरे, कार्यवाह सचिन जामगे, मुख्य समन्वयक ॲड. अनिश पाडेकर, सोमनाथ चोथे, गणेश बेंद्रे, निमंत्रक अक्षय बिक्कड उपस्थित होते.
साहित्ययात्री संमेलनाची ग्लोबल बुक ऑफ द एक्सलन्स, इंग्लडमध्ये नोंद :
पुणे ते दिल्ली प्रवासादरम्यान रेल्वेत होणाऱ्या मराठी साहित्ययात्री संमेलनाची ग्लोबल बुक ऑफ द एक्सलन्स, इंग्लडमध्ये नोंद करण्यात आली असून ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लडचे उपाध्यक्ष डॉ. दीपक हरके यांनी आज रेल्वे स्थानकावर झालेल्या मराठी साहित्ययात्रर संमेलनाच्या उद्घाटन समारंभात राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत व संयोजकांना याविषयीचे प्रमाणपत्र प्रदान केले. सरहद, पुणे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे दिल्ली येथे 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.