“या वयात साहेबांना सोडू शकत नाही…” : अजितदादांचा खंदा समर्थक उघडपणे शरद पवारांसोबत!

  • Written By: Published:
“या वयात साहेबांना सोडू शकत नाही…” : अजितदादांचा खंदा समर्थक उघडपणे शरद पवारांसोबत!

पुणे जिल्हा हा खुद्द शरद पवारांचा (Sharad Pawar) बालेकिल्ला. पवारांची सारी कारकीर्द या जिल्ह्याने घडवली. राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक जिवाभावाचे सहकारी आणि साथी त्यांना इथूनच मिळाले. समाजवादी काँग्रेस असो की राष्ट्रवादी काँग्रेस, पवारांच्या प्रत्येक संकटात पुणे जिल्ह्यातील नेते आणि त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने धावून आले. आता मात्र पुतण्या अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडानंतर परिस्थिती वेगळी दिसून येत आहे. पवारांचा पुणे जिल्हा हा खऱ्या अर्थाने अजित पवारांनीच 1999 नंतर सांभाळला. अजितदादांच्या कोणत्याही राजकीय निर्णयात पवारांनी पुणे जिल्ह्यात हस्तक्षेप करायचे नेहमी टाळले होते. त्यातूनच अजितदादांचा देखील वेगळा गट आणि चाहता वर्ग या जिल्ह्यात निर्माण झाला. त्यातूनच अजित पवार यांच्या बंडात पुणे जिल्ह्यातील बहुतांश आमदार सहभागी झाले. (MLA Ashok Pawar stand with ncp chief sharad Pawar reble ajit pawar)

राष्ट्रवादीचे पुणे जिल्ह्यात 21 पैकी दहा आमदार आहेत. त्यातील खुद्द अजित पवार हे एक आहेत. याशिवाय दिलीप वळसे पाटील, दत्तात्रय भरणे, सुनील शेळके, सुनील टिंगरे, अण्णा बनसोडे, दिलीप मोहिते या राष्ट्रवादीच्या आमदारांनी बंडाच्या पहिल्या दिवसापासून अजित पवारांना साथ दिली. तर जुन्नरचे आमदार अतुल बेनके आणि हडपसरचे आमदार चेतन तुपे हे दोघेही अद्याप तळ्यात मळ्यात आहेत. शरद पवारांच्या पाठीशी उघडपणे उभा राहणारा पुणे जिल्ह्यातील एकमेव आमदार म्हणजे शिरूरचे अशोक रावसाहेब पवार.

Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या 36 आमदारांचं साकडं… एकच प्रतिप्रश्न विचारत पवारांनी जाहीर केला निर्णय

अजितदादा आणि अशोक पवार या दोघांचे संबंध एकदम जवळचे आहेत. त्यांचे खंदे समर्थक म्हणून अशोक पवार ओळखले जातात. त्यामुळे ते अजितदादांसोबत राहतील अशी अटकळ पहिल्यापासून होती. प्रत्यक्षात त्यांनी शरद पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजित दादांच्या गटात येण्यासाठी त्यांना अनेक फोन झाले. पुणे जिल्ह्यातील इतर अजितदादांच्या समर्थक नेत्यांनी समजाविले. पण अशोक पवारांनी आपण शरद पवारांची साथ सोडणार नसल्याचा बाणा कायम ठेवला आहे. “तुम्ही कोणत्याच गटात जाऊ नका, तटस्थ रहा” असाही सल्ला अनेकांनी दिला. मात्र अशोक पवारांनी तो मानला नाही.

माझ्या कॉलेजच्या निवडणुकीत शरद पवारांचा फोटो वापरून मी यु. आर. झालो होतो, अशी जुनी आठवण जागी करत आता या वयात साहेबांना सोडणे बरोबर नाही अशी भूमिका अशोक पवारांनी घेतली आहे. अजित पवारांच्या बंडानंतर नाशिक येथे झालेल्या शरद पवारांच्या सभेला उपस्थित राहणारे अशोक पवार हे पुणे जिल्ह्यातील एकमेव आमदार होते. अशोक पवार यांचे वडील रावसाहेब दादा पवार हे देखील शिरूरचे आमदार होते. त्यांनी आपल्या मुलाला राजकारणात येऊ नये यासाठी बरेच प्रयत्न केले. आता माझ्या वडिलांचे म्हणणे मला खरे वाटते अशी भावना अशोक पवार राष्ट्रवादीतील या घडामोडीनंतर व्यक्त करतात.

अजित पवारांनी बंड केले पण शरद पवारांचा धसका संपेना; त्यातूनच गाठीभेटींचे सत्र

अजित पवारांनी राजकारणात अनेकदा साथ दिली, त्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचलो. तरीही साहेबांना सोडायची भावना मनातून होत नाही, असे ते बोलून दाखवतात. अशोक पवार यांची सत्ता असलेला घोडगंगा सहकारी साखर कारखाना अडचणीत आहे. भाजपच्या काही नेत्यांमुळे हा कारखाना अडचणीत आल्याचा दावा ते करतात. त्यांच्याशी मी आत्तापर्यंत अनेकदा भांडलो आहे. आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणे योग्य वाटत नाही. मी सरकारसोबत गेल्यानंतर कारखान्यासमोरील अडचणी दूर होतील, पण गद्दार म्हणून राजकारणात टिकण्यामध्ये काय अर्थ आहे? असा सवाल ते करतात.

पुणे जिल्ह्यातील खासदार अमोल कोल्हे, राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण, बारामतीच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे हे तिघेही शरद पवार यांच्यासोबत आहेत. मात्र आमदारांमध्ये अजितदादांच्या भावकीने अखेर काकांना साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच अशोक पवार त्यांचे वेगळेपण उठून दिसत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube