‘ये रेशमी जुल्फें…हे गाणे महिलेसमोर म्हणणे लैंगिक छळ नाही; पुण्यातील प्रकरणात मुंबई हायकोर्टाचा निकाल

  • Written By: Published:
‘ये रेशमी जुल्फें…हे गाणे महिलेसमोर म्हणणे लैंगिक छळ नाही; पुण्यातील प्रकरणात मुंबई हायकोर्टाचा निकाल

mumbai high court commenting on woman hair singing not sexual harassment: ऑफिसमध्ये महिला सहकाऱ्याच्या केसांवर टिप्पणी करणे आणि तिच्या केसांवर गाणे म्हणणे हे लैंगिक छळाच्या श्रेणीत येत नाही. त्याला लैंगिक छळ म्हणता येणार नाही. पुण्यातील (Pune) एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) असा निकाल दिला आहे. तसेच न्यायालयाने बँकेचा अंतर्गत अहवाल आणि औद्योगिक न्यायालयाचा निर्णय रद्द ठरविला आहे. महिलेवर गाणे म्हणणे चुकीचे आहे. पण त्यातून लैंगिक छळाचा ठोस निष्कर्ष काढता येत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे खासगी बँकेत अधिकारी असलेल्या व्यक्तीला दिलासा मिळाला आहे.

न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला आहे. पुण्यातील एचडीएफसी बँकेचे सहाय्यक प्रादेशिक व्यवस्थापक विनोद कच्छवे यांनी कार्यालयातील महिलेच्या केसांबद्दल टिप्पणी करून ये रेशमी जुल्फें हे गाणे म्हटले होते. तर दुसऱ्या एका प्रकरणात त्यांनी इतर महिला सहकाऱ्यांच्या उपस्थितीत एका पुरुष सहकाऱ्याच्या गुप्तांगांबद्दल टिप्पणी केली, असा आरोप करण्यात आला. महिलेने या प्रकरणी बँकेच्या अंतर्गत समितीकडे तक्रार केली होती. समितीने अधिकाऱ्याला दोषी ठरवून पदावन्नत केले होते. याविरोधात जुलै 2024 मध्ये औद्योगिक न्यायालयात बँक अधिकारी गेला होता. त्यांचे अपिलही न्यायालयाने फेटाळून लावले. तसेच कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, प्रतिबंध आणि निवारण) कायदा, 2013 अंतर्गत गैरवर्तन केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले होते. त्याविरोधात बँक अधिकाऱ्याने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

उच्च न्यायालयाने म्हटले आहे की बँकेच्या तक्रार समितीने याचिकाकर्त्याचे कथितवर्तन लैंगिक छळासारखे आहे की नाही याचा विचार केला नाही. घटनेशी संबंधित आरोप खरे मानले गेले तरी, याचिकाकर्त्याने लैंगिक छळाचे कोणतेही कृत्य केले आहे यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. उच्च न्यायालयाने बँकेचा सप्टेंबर 2022 चा अंतर्गत अहवाल तसेच पुणे औद्योगिक न्यायालयाचा आदेश रद्दबातल ठरविला. कच्छवे यांच्या वतीने सना रईस खान यांनी उच्च न्यायालयात युक्तिवाद केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube