मुंढवा जमीन घोटाळ्यातील मोठी बातमी! सर्व व्यवहार रद्द, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
आरोपांनंतर चौकशी समितीही गठीत करण्यात आली आहे. दरम्या आज, उपमुख्यमंत्री आणि पार्थ पवार यांचे वडिल अजित पवार यांनी मोठी घोषणा केली.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांनी 40 एकर जमीन फक्त 300 कोटी रुपयांमध्ये विकत घेत सरकारची फसवणूक केली असल्याचा आरोप गेली दोन दिवसांपासून होत होता. त्या आरोपांनंतर चौकशी समितीही गठीत करण्यात आली आहे. दरम्या आज, उपमुख्यमंत्री आणि पार्थ पवार यांचे वडिल अजित पवार यांनी हा व्यवहार रद्द झाला असल्याची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
आपला या प्रकरणाशी काही संबंध नाही, मला या व्यवहाराबद्दल काहीही माहिती नाही असंही अजित पवार म्हणालेत. दरम्यान, पुढे बोलताना या व्यवहारामध्ये एकही रुपया आतापर्यंत कोणालाही देण्यात आलेला नाही, असा मोठा दावा अजित पवार यांनी केला आहे. या प्रकरणातील सर्व व्यवहार रद्द करण्यात आले आहेत. सर्व दस्त देखील रद्द करण्यात आले आहेत, तसंच चौकशीसाठी समिती देखील गठीत करण्यात आली आहे, महिनाभरात या प्रकरणातील अहवाल सादर करण्याच्या सूचना या समितीला देण्यात आल्या आहेत, अशी माहिती यावेळी अजित पवार यांनी दिली आहे.
दरम्यान पुढे बोलताना त्यांनी असं देखील म्हटलं की, माझ्या नावाचा वापर केला तर ते मला चालणार नाही, कोणही असो, अधिकाऱ्यांनी कोणाच्याही दबावाखाली येऊ नये, अशा सूचनाही यावेळी अजित पवार यांनी दिल्या आहेत. पुण्यातील तब्बल 1800 कोटी रुपये किंमत असलेली जमीन 300 कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्यात आल्याचा आरोप या प्रकरणात होत आहे, तसेच नियमानुसा मुद्रांक शुल्क 6 कोटी रुपये होत असताना केवळ 500 रुपये इतकेच भरले गेल्याचा आरोप देखील होत आहे. त्यामुळे पार्थ पवार यांच्या अडचणी वाढल्या आहेत, दरम्यान आता हा संपूर्ण व्यवहारच रद्द करण्यात आला आहे.
मी राज्याचा उपमुख्यमंत्री असल्यामुळे माझ्या कुठल्याही अधिकाऱ्यांना, सर्व अधिकाऱ्यांना मला सूचना करायची आहे. इथून पुढे जर कुठला प्रकरण आलं आणि ते आम्हाला धरुन नसेल तर कुठल्याही प्रेशर खाली न येता त्यावर काठ मारायची, कोणीही माझा जवळचा नातेवाईक असला तरीही करायचं. मीडियाने या सर्व गोष्टी चालवल्या आहेत, याबद्दल चुकीच्या गोष्टी झाल्या असतील त्याची चौकशी संबंधित अधिकाऱ्यांनी करावी. कुठंही नियामाला बगल देऊन आपण कोणतीही गोष्ट केलेली नाही, तो माझा स्वभाव नाही असंही ते म्हणाले.
हे मी राज्याच्या जनतेला सांगतो. यामध्ये एकही पैशाचा व्यवहार झालेला नाही, बाकी रजिस्ट्रेशन कसं झालं, कोणी केलं हा तपासाचा भाग आहे. दोन पोलीस स्टेशन मध्ये एफआयआर दाखल झाली आहे. पोलीस पोलिसांचे काम करतील, त्यामध्ये कोणालाही राजकीय हस्तक्षेप करण्याचे काम नाही, दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे, असेही अजित पवार यांनी म्हटलं. ही सरकारी जमीन आहे, त्याचा व्यवहारच होऊ शकत नाही, ही पूर्वीचे महार वतनाची जमीन आहे.
रेवेन्यू आणि त्यांची टीम ही चौकशी करणार आहे. मग त्याचं झालं कसं? कोणी केलं कोण जबाबदार आहे याचा तपास होईल. तीन लोकांची एफआयआरमध्ये नावं टाकले आहेत. रेवेन्यू मिनिस्टर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की, जे ऑफिसमध्ये आले होते, ज्यांनी सह्या घेतल्या त्यांच्यावर एफआयआर दाखल करुन घेतली आहे, म्हणून पार्थ पवार याचे नाव नाही. याशिवाय या जमिनीचा 2005 किंवा 06 मध्ये याचा व्यवहार काही लोकांनी केला होता, पार्थ आणि त्याचा सहकारी दिग्विजय पाटील यांना कोणतीही माहिती नव्हती, असं त्यांच्या बोलण्यात आलं आहे. महिनाभरात हे सगळं पुढे येईल आणि वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांना कळेल.
