PCMC अजितदादांना धक्का, शहराध्यक्षसह 16 माजी नगरसेवक पवारांना भेटले

PCMC अजितदादांना धक्का, शहराध्यक्षसह 16 माजी नगरसेवक पवारांना भेटले

Pcmc Politics : पिंपरी चिंचवडच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या शहराध्यक्षासह 16 माजी नगरसेवकांनी आज संध्याकाळी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. आपण अजितदादांची साथ सोडणार असल्याचा मनसुबा या नेत्यांनी यावेळी व्यक्त केला.

विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज सकाळी भेट घेऊन आपल्या पुढील राजकारणासाठी शरद पवार यांच्या पक्षात जाणे योग्य राहणार असल्याचे स्पष्टपणे अजितदादांना या सर्व नेत्यांनी सांगितले होते. मात्र तुम्ही फार घाई करताय, असे समजावण्याचा प्रयत्न अजितदादांनी केला. मात्र तरीही या सर्वांनी शरद पवारांची मोदी बागेत आज संध्याकाळी भेट घेतली.

यातील बहुतांश माजी नगरसेवक हे भोसरी विधानसभा मतदारसंघातील (Bhosari Assembly Constituency) आहेत. पिंपरी- चिंचवड राष्ट्रवादीचे अन्य नगरसेवक ही तुतारी फुंकणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. राष्ट्रवादीच्या अजित पवार पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे (Ajit Gavane) यांच्या नेतृत्वाखाली ही मंडळी शरद पवारांना भेटली. आगामी विधानसभा गव्हाणे हे भोसरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांनीच आता याबाबत पुढाकार घेतल्याचे बोलले जाते.

महायुतीच्या (Mahayuti) जागावाटपात भोसरी विधानसभा मतदारसंघ हा भाजपकडे (BJP) जाणार असल्याची शक्यता असल्याने राष्ट्रवादीचे अनेक स्थानिक नेते इतर पर्याय शोधत आहेत. माजी आमदार विलास लांडे हे देखील आज शरद पवार यांना भेटण्यासाठी येणार असल्याची चर्चा होती. मात्र त्यांचे पुत्र या माजी नगरसेवकांसोबत शरद पवार यांना भेटल्याचे सांगण्यात आले. भाजपचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात मजबूत पर्याय देण्याचा शब्द या नेत्यांनी यावेळी शरद पवारांना दिला.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अजित पवार यांच्या पक्षातील पिंपरी-चिंचवड मधील नेत्यांमध्ये अस्वस्थता असून आणखीन काही माजी नगरसेवक हे शरद पवारांना भेटणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांना सांगितले.

‘हिटमॅन’ रोहित आणि ‘किंग’ कोहली आज खेळणार शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना?, जाणून घ्या मोठी अपडेट

अजित पवार यांचे वर्चस्व असलेल्या पिंपरी चिंचवड शहरामध्येच पक्षाला गळती लागणे धक्कादायक मानले जात आहे. पिंपरी आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघातील अजित पवार समर्थक अन्य काही नेते शरद पवारांच्या संपर्कात असल्याची ही चर्चा आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube