शिवाजीराव भोसले बँक घोटाळा प्रकरण : आमदार ज्ञानेश्वर कटकेंचे नाव वगळलं, हायकोर्टात जनहित याचिका दाखल

पुणे : शिवाजीराव भोसले बँकेच्या घोटाळ्यातून (Shivajirao Bhosale Bank Scam) शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके (MLA Dnyaneshwar Katke) यांचे नाव पोलिसांनी वगळले आहे. अशी माहिती कटके यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. तर, दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रामध्ये मालमत्ता लपवण्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर (Ketan Tirodkar) यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) आमदार कटके यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली आहे. यामुळे आमदार कटके यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे.
शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या घोटाळ्यामध्ये बँकेचे संचालक अनिल भोसले यांच्यासह काही जणांना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने २०२० आणि २०२१ मध्ये अटक केली होती. याच बँकेत राष्ट्रवादी पक्षाचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी वाघोली येथील आपल्या मालमत्ता गहाण ठेवून सुमारे ९ कोटी रुपयांचे कर्ज उचलले होते. तसेच भागीदारी असलेल्या मयुरी आनंद बिल्डिंगमधील स्वतःचे 4 फ्लॅट्स गहाण ठेऊन कर्ज घेतले होते.
पोलिसांनी इतर कर्ज बुडव्यांच्या जमिनी ताब्यात घेण्याची कारवाई केली. तथापि आमदार कटके यांच्या मालमत्ता फक्त प्रतिकात्मकरित्या जप्त केल्या. त्यामुळे आजही आमदारांकडे त्या जागांचा ताबा आहे. हे पुणे पोलिसांनी राजकीय दबावाखाली केल्याचे याचिकेत म्हटले आहे. तसेच एका पीडित महिलेला आमदार कटके यांनी करार करून 80 लाख रुपये बँक खात्यामधून दिले होते. ते पैसेही शिवाजीराव भोसले बँकेकडून घेतलेल्या कर्जातून फिरवले असल्याचा आरोप याचिकेत केला आहे
…तर मी माझे शब्द मागे घेतो, अखेर ‘त्या’ वक्तव्याबाबत आमदार गायकवाड यांची दिलगिरी!
आमदार कटकेंवर आरोप पत्र दाखल करा
उच्च न्यायालयाने पुणे पोलिसांना आमदार कटके यांच्यावर आरोप पत्र दाखल करण्याचे आदेश द्यावेत तसेच निवडणूक आयोगाला खोटे प्रतिज्ञापत्र दिल्याबद्दल योग्य ती कारवाई करण्याची सूचना करावी, अशी विनंती तिरोडकर ह्यांनी याचिकेत केली आहे.
20 कोटी 95 लाख 85 हजारांचे कर्ज
आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी भागीदारी असलेल्या आस्थापनांसाठी तब्बल 20 कोटी 95 लाख 85 हजार रुपयांचे कर्ज शिवाजीराव भोसले बँकेकडून घेतल्याचेही समोर आले आहे. परंतु या संदर्भात आमदार कटके यांच्यावर तसेच भागीदारी असलेल्या आस्थापनामधील इतर सदस्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. महत्त्वाचे म्हणजे गृहप्रकल्पांमध्ये महारेराच्या कायद्याचे उल्लंघन देखील करण्यात आले आहे. त्यामुळे आमदार कटके यांच्यावर कारवाई करण्याची विनंती केतन तिरोडकर यांनी याचिकेद्वारे उच्च न्यायालयाकडे केली आहे.
या आस्थापनांनी घेतली इतके कर्ज
आर्यन डेव्हलपर्स : आठ कोटी ५४ लाख ३४ हजार रु
संजीत बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड: सहा कोटी 53 लाख 83 हजार 600 रुपये
आर्यन असोसिएट्स: एक कोटी 55 लाख 49 हजार रुपये
आर्यन प्रमोटर्स अँड बिल्डर्स: चार कोटी बत्तीस लाख 19 हजार
बदनामी करणाऱ्यांविरोधात कारवाई करणार
दरम्यान, या संपूर्ण प्रकणात आमदार ज्ञानेश्वर कटके यांची नाहक बदनामी केली जात असून, प्रकरणाशी संबंधित सर्व पुरावे आणि माहिती पोलिसांना दिलेली आहे. मात्र, त्यानंतरही कटके यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असून, बदनामी करणाऱ्यांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचा इशाराही कटके यांच्या कार्यालयाकडून देण्यात आला आहे.