कधी सायकलही चालवली नव्हती, आज थेट पुणे मेट्रो चालवण्याची जबाबदारी अभिमानाने स्वीकारली! प्रियंका, हर्षदाचा प्रेरणादायी प्रवास
Pune Metro Pink Line 3 Women Loco Pilots; पिंक लाईन 3 मार्गिकेवरील मेट्रो चालवण्याची जबाबदारी 90 महिला लोकोपायलट सांभाळत आहेत.
Pune Metro Pink Line 3 Women Loco Pilots: स्वप्न पाहण्यासाठी परिस्थितीची मर्यादा नसते आणि ते पूर्ण करण्यासाठी जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते, हे पुणे मेट्रोच्या दोन महिला लोकोपायलटनी दाखवून दिलं आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर या पिंक लाईन 3 मेट्रो मार्गिकेचं लोकार्पण झालं असून, या मार्गिकेवरील मेट्रो चालवण्याची जबाबदारी 90 महिला लोकोपायलट सांभाळत आहेत. विशेष म्हणजे, यातील काही महिलांनी यापूर्वी कधीच कोणतंही वाहन चालवलं नव्हतं. मात्र, आज त्याच महिला हजारो प्रवाशांना सुरक्षितपणे त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवत आहेत. प्रियंका रणगावडे आणि हर्षदा जोगते या दोघींनी लेट्सअप मराठीशी संवाद साधताना आपला हा प्रवास उलगडला.
सायकलपासून थेट मेट्रोपर्यंत; प्रियंकाला आपल्या कामाचा अभिमान
वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील प्रियंका सुनील रणगावडे हिचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. मेट्रो चालवण्यापूर्वी प्रियंकाने केवळ सायकल चालवली होती. त्यानंतर थेट मेट्रोचं प्रशिक्षण घेत तिने लोकोपायलट म्हणून जबाबदारी स्वीकारली.
प्रियंका सांगते की, मेट्रो चालवण्यासाठी तिचं तीन महिन्यांचं प्रशिक्षण झालं. त्यानंतरच तिला प्रवासी सेवा सुरू करण्याची संधी मिळाली. सुरुवातीला मेट्रो चालवताना भीती वाटायची, पण हळूहळू आत्मविश्वास वाढत गेला. आज एकाच वेळी जवळपास 1,000 प्रवाशांची जबाबदारी सांभाळताना आणि त्यांना सुरक्षितपणे इच्छित स्थळी पोहोचवताना खूप अभिमान वाटतो, असं ती सांगते.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी राजवर्धन शिंदेंची बिनविरोध निवड
विशेष म्हणजे, आपल्या मंगरुळपीर जिल्ह्यातून मेट्रो लोकोपायलट होणारी आपण पहिलीच मुलगी असल्याचंही प्रियंकाने अभिमानाने सांगितलं. एका छोट्या गावातून आलेल्या मुलीने आज मेट्रोचं सारथ्य करण्यापर्यंत मारलेली मजल अनेक मुलींसाठी प्रेरणा देणारी आहे.
कधीच गाडी चालवली नव्हती, आता थेट मेट्रोचं सारथ्य
पुण्यातील हर्षदा राजेंद्र जोगते हिची गोष्टही तितकीच खास आहे. हर्षदाने इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये पदवी पूर्ण केली. त्यानंतर मेट्रो चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं. सहा महिन्यांच्या प्रशिक्षणातून तिने मेट्रो चालवण्याचा आत्मविश्वास मिळवला.
तिसऱ्या अपत्यामुळे राम शिंदेंना फटका बसलेला नियम कालबाह्य होणार? SC च्या भूमिकेने वाढवली उत्सुकता…
विशेष म्हणजे, हर्षदाने याआधी कधीही कोणतीही गाडी चालवली नव्हती. मात्र, आज ती थेट मेट्रो चालवत आहे. प्रशिक्षणादरम्यान थेअरीत शिकलेल्या गोष्टी आणि प्रत्यक्ष मेट्रो चालवताना येणारा अनुभव यात खूप फरक असल्याचं ती सांगते. हर्षदाची ड्युटी आठ तासांची असते. तिच्या या कामाचा घरच्यांनाही अभिमान वाटतो, असं तिने सांगितलं.
90 महिला लोकोपायलटच्या हातात पुणे मेट्रोची धुरा
हिंजवडी ते शिवाजीनगर पिंक लाईन 3 मेट्रो मार्गिकेवर तब्बल 90 महिला लोकोपायलट कार्यरत आहेत. प्रियंका आणि हर्षदासारख्या अनेक महिला मेट्रोच्या माध्यमातून प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर करत आहेत. कधी वाहन चालवण्याचा अनुभव नसलेल्या मुली आज हजारो प्रवाशांची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत. त्यामुळे या दोघींचा प्रवास केवळ नोकरी मिळवण्यापुरता मर्यादित नसून, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर स्वप्नांना गवसणी घालणाऱ्या महिलांची प्रेरणादायी कहाणीच आहे.