ललित पाटीलच्या जीवाला धोका; वकिलाचा न्यायालयात मोठा दावा, पोलीस कोठडी वाढ
Lalit Patil Drugs Case: ड्रग्ज तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांनी ललित पाटीलला (Lalit Patil Drugs Case) जेरबंद केल्यानंतर कारवाईला वेग आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आणखी दोन महिलांना अटक केली आहे. ललित पाटील ज्यावेळी ससून रुग्णालयातून पळून गेला त्यानंतर या दोघी जणी त्याच्या संपर्कात होत्या. या दोन महिलांनी त्याला पळून जाण्यात मदत केल्याची माहिती समोर आली. सध्या पुणे पोलिसांच्या (Pune Police) ताब्यात असून त्याला पुणे पोलिसांची कोठडीत वाढ मिळाली आहे. ललित पाटीलच्या जीवाला पुणे पोलिसांकडून धोका असल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला.
या प्रकरणात पुणे पोलीसही अॅक्टिव्ह झाले आहेत. त्यांनी काल नाशिकमधून दोन महिलांना अटक केली आहे. ललित पाटील पळून गेल्यानंतर तो नाशिकला गेला होता. तो येथे आला त्यावेळी या महिलांनी त्याला पैसे दिले होते. तसेच त्याची राहण्याची आणि पळून जाण्यासाठी देखील मदत केल्याची माहिती समोर आली होती. जमा झालेले पैसे आणि सोने सुद्धा या महिलांकडेच होते अशी माहिती पोलिसांकडे होती. पुणे पोलिसांनी बुधवारी रात्री या महिलांना नाशिक शहरातून अटक केली आहे. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
चेन्नईमार्गे ललित पाटील श्रीलंकेत जाण्याच्या तयारीत होता अशी माहिती चौकशीतून समोर आली आहे. यासाठी त्याने खास नियोजन केले होते. ससूनमधून पळ काढल्यानंतर पाटील धुळे, नाशिक आदी शहरांसह इतर ठिकीणी वास्तव्ययास होता. नाशिकमध्ये वास्तव्यास असताना ललितने त्याची बँकेतील FD मोडली होती. त्या पैशातून त्याने किलोभर सोनेदेखील विकत घेतल्याचे समोर आले आहे. हे घेऊन तो श्रीलंकेत जाण्याच्या तयारीत होता. मात्र, त्याआधीच मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली. त्यामुळे हा सर्व व्यवहार एवढा सहजासहजी कसा काय होऊ शकतो असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
‘सर्वपक्षीय बैठकीला समाजवादीच्या अबू आझमींना आमंत्रण नाही, पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे नाराजी
ललित पाटील याला अटक केल्यानंतर मुंबई पोलिसांची पाठ थोपटली जात आहे. तर, दुसरीकडे त्याच्या अटकेनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याच्या आई-वडिलांनी भावनिक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ललितला अटक झाल्याचे आम्हाला माध्यमांकडून कळालं. मात्र त्याचं म्हणणं ऐकून घ्यावं त्यानंतरच त्याच्यावर कारवाई करावी. मात्र, त्याचं एन्काऊंटर करू नये अशी मागणी ललित पाटीलच्या पालकांनी केली.