ठरलं! राहुल कलाटे भाजपवासी होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट, उद्या प्रवेश होण्याची शक्यता
राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली असून ते उद्या प्रवेश करणार आहेत.
महापालिका निवडणुका जाहीर झाल्यापासून (Congress) पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी पक्ष प्रवेशाचा धडाका लावला आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी आमने सामने लढतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे ताकदवर उमेदवरांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपाकडून प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनाही पक्ष प्रवेशासाठी मनधरणी केल्याची चर्चा होती. मात्र मागच्या काही दिवसात राहुल कलाटे यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत मॅरेथॉन बैठका करत आपला भावी राजकीय मार्ग निश्चित केल्याचं दिसून येत आहे.
पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणात मोठी हालचाल होत असून, महापालिकेत गटनेता म्हणून पाच वर्ष काम केलेले नेते, विधानसभा निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवून देखील आपली प्रचंड ताकद दाखवणारे उमेदवार, शरद पवार गटाचे नेते आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक राहुल तानाजी कलाटे हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सध्या शहरात सुरू आहे. त्यांचा उद्या मुंबई येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, चंद्रकांतदादा पाटील, मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत राहुल कलाटे यांचा भाजपा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे अशीही माहिती समोर आली आहे.
काँग्रेसला मोठा धक्का, आमदार प्रज्ञा सातव या; दिवशी करणार भाजपमध्ये पक्षप्रवेश
या प्रवेशामुळे पिंपरी चिंचवडमधील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडणार असल्याचं मानले जात आहे. याबाबत विचारणा केल्यावर राहुल कलाटे यांनी स्पष्ट उत्तर देण्याचे टाळले. तथापि, त्यांनी “तुमच्या मनात जे आहे तेच होईल, असं सूचक विधान केलं आहे. मागील काही दिवसांपासून या चर्चेला अधिकाधिक जोर चढला असून, शहरात कार्यरत असलेला विरोधी गटातील एक प्रभावशाली नेता भाजपात प्रवेश करणार असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवडमधील सर्वात मोठा विरोधक आपल्या बाजूला वळवला असल्याची चर्चा आता शहरात रंगली आहे.
राहुल कलाटे यांनी विरोधात असताना नगरसेवक म्हणून पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील विविध विकास विषयक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला आहे. आक्रमक विरोधक अशी त्यांची प्रतिमा आहे. वाकड ताथवडे पुनावळे परिसरातील रस्त्यांचे प्रश्न, शहर विकास आराखडा, पाण्याची टंचाई, रस्त्यांची दुर्दशा, वाढत्या अपघातांचा विषय आणि विविध पुलांचे बांधकाम अशा विषयांवर त्यांनी नेहमीच ठाम भूमिका मांडली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर, आजवर विरोधातून उपस्थित केलेल्या या प्रश्नांना ते सत्ताधारी भूमिकेतून कसा न्याय देतील, याकडं शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
