2029 ला तुम्ही विधानसभेत जाणार नाहीत…, विद्यार्थ्यांवरील टीकेनंतर रोहित पवारांचा आक्रमक होत इशारा
MPSC Student Protest : विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरुन रोहित पवार आणि विक्रम पाचपुते यांच्यात जुंपली, रोहित पवारांनी थेट इशारा दिला आहे.
पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचं (MPSC) आंदोलन गेल्या 5 दिवसांपासुन सुरु असतानाच या आंदोलनात सहभागी झालेले आमदार रोहित पवार आणि भाजप आमदार विक्रम पाचपुते यांच्यातील वाद आता चांगलाच पेटला आहे. पाचपुते यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना रोहित पवार यांनी थेट 2029 च्या विधानसभा निवडणुकीचा उल्लेख करत पाचपुते यांना निवडणुकीत पराभुत करण्याचं आव्हान दिलं आहे. पुण्यात सोमवारी एमपीएससी विद्यार्थ्यांसमोर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
या वादाची सुरुवात विक्रम पाचपुते यांच्या टीकेनं झाली होती. पुण्यात सुरु असलेलं एमपीएससी आंदोलन विद्यार्थ्यांचं राहिलेलं नसुन रोहित पवार नाईटस कार्यक्रम सुरु असल्याची टीका त्यांनी केली होती. आंदोलनस्थळी दिवसभर मोजकेच लोक असतात आणि विद्यार्थ्यांनी आंदोलनाकडे पाठ फिरवली असल्याचा दावाही पाचपुते यांनी केला. तसंच आंदोलनाच्या माध्यमातुन राज्याला वेठीस धरण्याचं काम सुरु असुन रोहित पवार अर्बन नक्सल तयार करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता.
पाचपुतेंच्या याच आरोपांवर रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांसमोर संताप व्यक्त केला. सामान्य कुटुंबातील, शेतकरी कुटुंबातील आणि अधिकारी होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्बन नक्सल म्हणणं चुकीचं असल्याचं त्यांनी सांगितलं. माझ्यावर टीका करण्याच्या नादात विद्यार्थ्यांचा अपमान करण्यात आला असुन या वक्तव्याचा निषेध करतो, असं म्हणत रोहित पवार यांनी पाचपुतेंना थेट इशारा दिला. याच वेळी 2029 मध्ये संबंधित आमदार विधानसभेत जाणार नाहीत, अशी जबाबदारी आपण घेत असल्याचंही त्यांनी म्हटलं.
रोहित पवार नव्या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात? भाजप नेत्याचा मोठा दावा
रोहित पवारांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात जुन्या एका प्रसंगाचीही चर्चा सुरु झाली आहे. काही वर्षांपुर्वी अजित पवार यांनी पुरंदरचे तत्कालीन आमदार विजय शिवतारे यांच्याबाबत विधानसभा निवडणुकीत पराभुत करण्याचं आव्हान दिलं होतं. 2014 मध्ये निवडुन आले असलात तरी 2019 मध्ये आमदार कसे होता ते पाहतो, अशा आशयाचं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. त्यानंतर झालेल्या राजकीय घडामोडींमुळे हे वक्तव्य मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं होतं.
दरम्यान, रोहित पवारांनी दिलेल्या या इशाऱ्यानंतर विक्रम पाचपुते यांनीही पलटवार केला आहे. रोहित पवारांच्या राजकीय अहंकाराचा परिणाम एमपीएससी विद्यार्थ्यांवर होऊ देऊ नये, अशी टीका त्यांनी केली. स्वतःचा इगो जपण्यासाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरणं योग्य नसुन विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न हा कोणाच्याही राजकीय प्रतिष्ठेचा विषय बनवु नये, असं पाचपुते यांनी म्हटलं.
एमपीएससी आंदोलनाच्या मुळ प्रश्नांपेक्षा आता रोहित पवार आणि विक्रम पाचपुते यांच्यातील शाब्दिक संघर्ष अधिक चर्चेत आला आहे. एका बाजुला विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन सुरु असल्याचा दावा केला जात असताना दुसऱ्या बाजुला या आंदोलनाचा राजकीय वापर होत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर सुरु झालेला हा राजकीय वाद पुढे आणखी कोणतं वळण घेतो, याकडे लक्ष लागलं आहे.