Pune News : शिक्षक दिनानिमित्त सचिन सानप यांच्यातर्फे गुणवंत शिक्षकांचा सन्मान…
पुण्यात एकलव्य फाऊंडेशनतर्फे गुणवंत शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. पुणे शिक्षक मतदारसंघातून निवडणुकीस इच्छुक उमेदवार सचिन सानप कार्यक्रम आयोजित केला.
Teacher Day : शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपण एक दिवस शिक्षकांचा सन्मान करतो. परंतु, या पुढील काळात शिक्षक दीन होणार नाही याची सुध्दा काळजी घेण्याची गरज आहे. तसेच शिक्षकांनी बदलत्या काळानुसार स्वत:मध्ये सुद्धा आवश्यक बदल करून घायायला हवेत. कितीही ‘एआय’चे जग आले तरी विद्यार्थी घडवण्याचे कार्य केवळ शिक्षकच करू शकतात. त्यातच आपल्या अपेक्स बॉडी निरसित होत आहेत. त्यामुळे पुढील काळात वेगळे अधिष्ठान निर्माण होणार असून शिक्षकांचे महत्त्व शिक्षण व्यवस्थेमध्ये टिकवून राहण्यासाठी आपल्याला सर्व फोरमवर संवाद साधावा लागेल. त्यातील एका फोरमचे नेतृत्व करण्यापेक्षा प्रतिनिधित्व करण्याचा मानस सचिन सानप यांनी व्यक्त केला, त्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी रविवारी केले.
एकलव्य फाऊंडेशनतर्फे शिक्षक दिनानिमित्त पुणे शिक्षक मतदार संघातून निवडणुकीस इच्छुक उमेदवार प्रा.सचिन सानप यांनी आयोजित केलेल्या गुणवंत शिक्षक सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमात डॉ. पराग काळकर बोलत होते. यावेळी रायसोनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. डी. खराडकर, एम. फुक्टोचे माजी अध्यक्ष डॉ. एस.पी.लवांडे, जाधवर ग्रुप ऑफ इंस्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ.सुधाकरराव जाधवर, करिअर मार्गदर्शक विठ्ठल कांगणे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे सचिव आनंद काटीकर, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सहकार्यवाह दीपक मराठे, शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष रावसाहेब त्रिभुवन, टीओपीचे अध्यक्ष शितलकुमार रवंदळे, मुख्याध्यापक संघाचे सचिव शिवाजी शिंदे, पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य हर्ष गायकवाड, राजेंद्र निकम, सुभाष जावळे, प्रवीण चोपडे, वाडिया कॉलेजच्या प्राचार्या ऋषाली रणधीर, डॉ. आनंद धडस आदी उपस्थित होते. यावेळी पुणे जिल्ह्यातील अनेक गुणवंत शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
डॉ. सुधाकर जाधवर म्हणाले, शिक्षकांना शिक्षक म्हणून जाणीव करून घेणे महत्त्वाचे आहे. शिक्षक हा भारताचा उपराष्ट्रपती होतो. शिक्षकांमध्ये ही ताकत आहे. शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षकांचा प्रतिनिधी हा शिक्षकच असला पाहिजे, ही सचिन सानप यांनी घेतलेली भूमिका महत्त्वाची असून सर्व शिक्षक निश्चितच त्याचा विचार करतील.
आर. डी. खराडकर म्हणाले, सानप यांच्यामध्ये समाजाप्रती बांधीलकी आहे, सामाजिक नाळ ,शिक्षक आणि शिक्षण हे जुळून आले आहे.त्यांच्या निवडणूकीच्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे.
एस.पी.लावांडे म्हणाले, आई वडिलापेक्षा विद्यार्थ्यांचा जास्त विश्वास शिक्षकावर असतो तो अधिक दृढ करण्याचा निश्चय आपण केला पाहिजे. शिक्षकांचे प्रश्न विधीमंडळात, रस्तावर आणि न्यायालयात लढावे लागतात. शिक्षकांचा आमदार हा शिक्षकच असला पाहिजे. अलीकडच्या काळात शिक्षकांचे प्रश्न योग्यपणे मांडले जात नाहीत. शिक्षक आमदार बी. टी. देशमुख यांच्यानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढली पाहिजे. विठ्ठल कांगणे म्हणाले, शिक्षकांचे प्रश्न शिक्षकच जाणू शकतो. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांची जाण असणाऱ्या सचिन सानप यांच्या सारख्या व्यक्तीला पाठिंबा देण्याची आवश्यकता आहे. तसेच गेल्या काही वर्षात पालकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मात्र, इतरांच्या मुलांशी स्पर्धा करण्यात आपल्या मुलांचे बालपण मारू देऊ नका,असेही कांगणे म्हणाले.
आनंद काटीकर यांनी ‘शिक्षकांचा उमेदवार हा शिक्षक असला पाहिजे’ या सचिन सानप यांनी घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला.यावेळी रावसाहेब त्रिभुवन, शितलकुमार रवंदळे, शिवाजी शिंदे, डॉ. देविदास वायदंडे आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक करताना सचिन सानप म्हणाले, शिक्षकांचा उमेदवार शिक्षकच असावा, ही भूमिका घेऊन मी शिक्षक निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत.शिक्षकांना सध्या शिकवायला वेळ मिळत नाही. नवीन शैषणिक धोरणाच्या अनुषंगाने कार्यभाराच्या अनुषंगाने असणारी संदिग्धता आहे.ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक प्रॅक्टिकलचे नियम बदलल्याने शिक्षक संख्या कमी होत आहे. CHB च्या प्राध्यापकांची संख्या कमी झाली आहे. GDP च्या तुलनेत शिक्षणावर खर्च होत नाही. प्राध्यापक भरती रखडली आहे.मी प्राध्यापक असल्याने शिक्षकांच्या वेदना, सहावेदना समजू शकतो.
कार्यक्रमात सचिन सानप यांनी शिक्षकांना उद्देशून लिहिलेले पत्र वाचून दाखवण्यात आले.कार्यक्रमास वाडिया कॉलेजसह विविध महाविद्यालय व शाळांचे शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.