हवेत उडणाऱ्यांनो थोडं जमिनीवर लक्ष द्या; वसंत मोरेंचा मुरलीधर मोहोळ यांना टोला…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ड्रोन शोवरुन ठाकरे गटाचे नेते वसंत मोरेंन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांवर निशाणा साधला.

Vasant More On Murlidhar Mohol : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या पुढाकाराने पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या ड्रोन शोवरून शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते वसंत मोरे यांनी मोहोळ यांच्यावर खोचक टीका केली आहे. हवेत उडणाऱ्यांनो थोडं जमिनीवर लक्ष द्या, असं म्हणत आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून मोरेंनी मोहोळ यांना लक्ष केलं आहे.
वसंत मोरेंनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं की, परवा दिवशी पुण्यात ड्रोन शो झाला, आपण म्हटलं कंपनीला विचारावं किती खर्च येतो, कंपनीने हे कोटेशन दिले आहे. १००० ड्रोन आकाशात अर्धा तास उडविण्यासाठी एक कोटी रुपये…
बापरे….
या एक कोटी रुपयांमध्ये आमच्या पुण्यातील ससून रुग्णालयाचे किती काम झाले असते. तेव्हा हवेत उडणाऱ्यांनी थोडं जमिनीवरही लक्ष द्यावं…,विचार पुणेकरांनो तुम्हाला करायचा आहे, अशा शब्दात मोरेंनी केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांना टोला लगावला आहे.
पंतप्रधान मोदींचा 75 व्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील एस.पी. कॉलेजच्या मैदानावर या ड्रोन शोचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या खर्चावरून मोरेंनी पुण्याचे खासदार आणि केंद्रात राज्यमंत्री झालेले मोहोळ यांना डिवचल आहे. एका बाजूला असा मोठा खर्च केला जातोय. तर दुसऱ्या बाजूला पुण्यातील ससून रुग्णालयातील समस्येचा दाखला देत त्यांनी त्यांच्या स्टाईलने याकडे लक्ष वेधलं आहे.
फडणवीस पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहत आहेत – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळाचा दावा
मोरेंनी या ड्रोन शोला किती खर्च येतो हे पाहण्यासाठी चक्क त्या संबधित कंपनीकडून कोटेशनही मागवून घेतलं आहे. कंपनीने पाठवलेल्या कोटेशनमध्ये एक हजार ड्रोन अर्धा तासासाठी आकाशात उडवण्यासाठी एक कोटी रुपये खर्च सांगण्यात आला. या कोटेशनचा फोटोही मोरेंनी फेसबुकवर टाकला आहे.
दरम्यान,आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. यामध्ये मोरेंनी आघाडी घेतली असून स्थानिक प्रश्नाकडे लक्ष वेधत कोट्यावधीचा ड्रोन शोच्या खर्चावर बोट ठेवत मोहोळांना खिंडीत पकडलं आहे. मोरे यांनी केलेल्या टीकेला भाजप आणि मोहोळ यांच्याकडून काय उत्तर दिलं जातं हे पहावं लागणार आहे.
दरम्यान, दसरा झाल्यानंतर दोन दिवसांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील पुण्यात येणार आहेत त्यावेळी ते यावर कायभाष्य करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.