पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या स्वीकृत नगरसेवकांचा तिढा अखेर सुटला; राष्ट्रवादीच्या नियुक्त्यांचाही मार्ग मोकळा
गेल्या काही महिन्यांपासून स्वीकृत सदस्य नियुक्तीचा विषय अनेकदा महासभेत तहकूब करण्यात आला होता.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील भाजपच्या (Pune) स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा अनेक दिवसांपासून सुरू असलेला तिढा अखेर सुटला आहे. प्रदेश नेतृत्वाने सात स्वीकृत नगरसदस्यांची यादी अंतिम केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. उद्या (दि. १५ जून) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत (GB) या नियुक्त्यांना मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
भाजपकडून युवा चेहरा गिरीश देशमुख, माजी महापौर उषा संजोग वाघेरे, माजी नगरसेविका सुजाता पालांडे, माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, रावेत येथील दीपक भोंडवे, माजी नगरसेविका विनया तापकीर आणि सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग साने यांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे समजते.
समाजासाठी झटणाऱ्या घटकांसाठी पुढाकार, जाधवर इन्स्टिट्यूटस तर्फे शैक्षणिक शुल्कात 25 टक्के सवलत
दरम्यान, भाजपची यादी अंतिम झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्वीकृत सदस्य नियुक्तीचाही मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रवादीकडून माजी नगरसेविका सीमा सावळे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप आणि पक्षाचे प्रवक्ते फझल शेख यांच्या नावांचा प्रस्ताव प्रलंबित होता.
गेल्या काही महिन्यांपासून स्वीकृत सदस्य नियुक्तीचा विषय अनेकदा महासभेत तहकूब करण्यात आला होता. मात्र, भाजपकडील अंतर्गत चर्चा आणि प्रदेश नेतृत्वाच्या अंतिम निर्णयानंतर आता या नियुक्ती प्रक्रियेला गती मिळाली असून उद्याच्या महासभेत सर्व प्रस्तावांना मंजुरी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.महापालिकेतील स्वीकृत सदस्य नियुक्तीच्या या प्रक्रियेमुळे आगामी राजकीय समीकरणांनाही वेग येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.