EXCLUSIVE : पॅनल काढत असताना अजितदादा अन् सुप्रियाताईंशी बोलणं झालं होतं ; दांगटांचा गौप्यस्फोट
प्रतिनिधी – विष्णू सानप
Vikas Dangat Ob Ajit Pawar : हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि भाजपच्या अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनलने 18 पैकी 13 जागांवर दणदणीत विजय मिळवत राष्ट्रवादी पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनलचा धुव्वा उडवला आहे.
दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीपाठोपाठ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीसोबत दांगटांनी बंडखोरी केल्याने ही निवडणूक चांगलीच गाजली. मात्र, हे पॅनल उभं करत असताना अजित पवार आणि सुप्रियाताईंशी चर्चा झाली होती, असा गौप्यस्फोट त्यांनी ‘लेट्सअप मराठी’शी बोलताना केला आहे.
दांगट म्हणाले, जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणूक निमित्ताने जी टीम होती ती बाजार समितीच्या निवडणुकीत देखील सोबत राहिल्याने आमच्या पॅनलचा विजय होईल, असा विश्वास होता. जिल्हा बँकेच्या वेळी काही जणांना शब्द दिला होता आणि तो शब्द पाळण्यासाठी आपण निर्णय घेतल्याचही दांगट यांनी यावेळी सांगितले.
आपण पक्षाच्या विरोधात पॅनल उभं केलं आपण राष्ट्रवादी सोडणार का? या प्रश्नावर दांगट म्हणाले, नेत्यांची दिशाभूल करणारे काही मंडळी आहे मात्र नेते नेते आहेत याबाबत मला फारसा काही बोलायचं नाही. मी एक छोटा कार्यकर्ता आहे निवडून आलेली टीम निश्चितच विकास करेल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
तुम्ही भाजपकडून खडकवासला लढणार प्रदीप गारटकरांचा आरोप?
कालच्या निकालातून गारटकरांना स्वच्छ आणि स्पष्ट उत्तर मिळाला आहे. त्यांनी आता आत्मपरीक्षण करावं तसेच, त्यांना हवेली तालुका समजण्यासाठी अनेक. जन्म घ्यावे लागतील, असा टोलाही दांगट यांनी गारटकरांना लगावला.
पॅनल काढताना अजित पवारांनी समजूत काढली होती का?
अजितदादांनी समजूत काढली होती. मात्र, मला खात्री होती, असे म्हणत त्यांनी काय चर्चा झाली हे सांगणं मात्र टाळलं. मात्र, दादा दादा आहेत, असं सूचक विधान केलं. तसेच सुप्रिया सुळे यांच्याशी देखील बोलणं झालं असल्याचं सांगत ते म्हणाले, पॅनल संपूर्ण निवडून येईल काहीही अडचण येणार नाही. मात्र, दुःख एवढेच आहे की माझे सहकारी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शुक्राभाऊ वांजळे हे निवडून येऊ शकले नाही. त्यामुळे ‘गड आला पण सिंह गेला’ पण त्यांनाही भविष्यात कुठेतरी संधी दिली जाईल, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
निवडणुकीत किती खर्च झाला? या प्रश्नावर मात्र त्यांनी थेट उत्तर न देता धनशक्तीविरोधात आमचा सामना होता आणि आम्ही जिंकलो असं उत्तर दिलं. सभापती कुठल्या पक्षाचा होणार याचं उत्तर थेट दिलं नाही. या विजयाचे श्रेय कुठल्या पक्षाला किंवा नेत्याला आपण देणार या प्रश्नावर देखील त्यांनी संभ्रमात टाकणार उत्तर देत तालुक्याला देणार, असं म्हणत प्रश्नांची थेट उत्तर देण टाळलं. याबरोबरच आपण अजित पवारांना भेटणार का? यावर देखील त्यांनी वेट अँड वॉच असं उत्तर देत आपल्या पुढील राजकीय वाटचालीचा सस्पेन्स कायम ठेवला आहे.
दरम्यान, झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत दांगट यांनी बाजी मारत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुरस्कृत पॅनलचा धुवा उडवला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पॅनलचे 2 उमेदवार विजयी तर 3 जागांवर स्वतंत्र पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहे. तर अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीला 18 पैकी 13 जागांवर दणदणीत विजय मिळाला आहे. आता या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपनेही हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिरकाव केला असल्याने सभापती कुणाचा आणि कोण होणार तसेच, दांगट यांची पुढील राजकीय वाटचाल कशी असणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.