David Warner : 100 व्या कसोटीत 200 धावा, तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी
मेलबर्न : दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा (Australia) सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने (David Warner) आपल्या 100व्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावले. या द्विशतकासोबत बरेच विक्रम त्याने नावावर केले आहेत.
200 धावा केल्यानंतर त्याला हाताच्या दुखण्यामुळे मैदान सोडावे लागले होते, त्याने 254 चेंडूत 200 धावा केल्या. या खेळीत त्याने 16 चौकार आणि 2 षटकार मारले. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर 100 व्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावणारा पहिला ऑस्ट्रेलियन आणि जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे.
त्याच्याआधी केवळ इंग्लंडचा महान फलंदाज जो रूटला ही कामगिरी करता आली होती. त्याने 2021 मध्ये भारताविरुद्धच्या 100 व्या कसोटीत 218 धावांची इनिंग खेळली होती.डेव्हिड वॉर्नरनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलामीवीर म्हणून 45 वं शतक झळकावलं.
या शतकासह त्याने भारताचा महान माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची बरोबरी केली आहे. सचिनने सलामीवीर म्हणून आपल्या कारकिर्दीत 45 शतकं झळकावली आहेत. सचिनने वनडेमध्ये ही सर्व शतके झळकावली असली तरी. दुसरीकडे, वॉर्नरनं एकदिवसीय, कसोटी आणि टी-20 सामन्यांमध्ये सलामीवीर म्हणून 45 शतकं झळकावली आहेत.