ऑस्ट्रेलियाला WorldCup जिंकून देणारा ‘या’ कर्णधाराने केली निवृत्तीची घोषणा
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाच्या T20 चा कर्णधार ऍरॉन फिंचने (Aaron Finch) मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. निवृत्तीची घोषणा करताना त्याने सांगितले की, खेळातील काही सर्वोत्तम खेळाडूंसोबत खेळण्याचा मान मला मिळाला. गेल्या वर्षीच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या फिंचने आता टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटलाही अलविदा केले आहे.
ऑस्ट्रेलियाकडून खेळताना फिंचने पाच कसोटी, 146 वनडे आणि 103 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने 76 टी 20 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले आहे आणि असे करणारा तो पहिला ऑस्ट्रेलियन आहे. स्फोटक सलामीवीर ऍरॉन फिंचने 12 वर्षांच्या कारकिर्दीत 254 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. 36 वर्षीय कर्णधाराने 2021 मध्ये दुबईत झालेल्या T20 विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला विश्वविजेते बनवले.
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू फिंचने मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “मी 2024 पर्यंत टी-20 विश्वचषक खेळू शकणार नाही याची जाणीव झाली.” अशा परिस्थितीत निवृत्ती घेण्याची आणि संघाला वेळ देण्याची हीच योग्य वेळ आहे, जेणेकरून आगामी स्पर्धेची तयारी पूर्ण करता येईल.
फिंचने 146 एकदिवसीय सामन्यांमध्ये 17 शतके आणि 30 अर्धशतकांच्या मदतीने 38.89 च्या सरासरीने 5406 धावा केल्या. आणि T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने 103 सामन्यांमध्ये दोन शतके आणि 19 अर्धशतकांच्या मदतीने 3120 धावा केल्या. यादरम्यान त्याची सरासरी 34.28 होती तर स्ट्राइक रेट 142.53 होता. फिंचला कसोटी क्रिकेटमध्ये फारसे यश मिळाले नाही. त्याने 5 कसोटी सामन्यांच्या 10 डावात दोन अर्धशतकांच्या मदतीने 278 धावा केल्या. त्याची सरासरी 27.80 होती.