बांगलादेशची टी-20 वर्ल्ड्कपमधून माघार; भारतात सामने खेळणार नसल्याचं केलं जाहीर
राष्ट्रीय संघातील खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर बांगलादेशचे क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल यांनी स्पष्ट भूमिका मांडली.
Bangladesh announces it will not play matches in India : भारतामध्ये होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकाबाबत बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आक्षेप नोंदवला असून, सध्या या निर्णयावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. राष्ट्रीय संघातील खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर बांगलादेशचे क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल यांनी स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले की, बांगलादेशला विश्वचषक खेळायची पूर्ण तयारी आहे, मात्र भारतात खेळताना खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता आहेत. या पार्श्वभूमीवर बीसीबीचे अध्यक्ष अमिनुल इस्लाम बुलबुल यांनी आयसीसीशी पुन्हा चर्चा करण्याचा इरादा व्यक्त केला आहे. आयसीसीने या चिंता समजून घ्याव्यात आणि तोडगा काढावा, अशी मागणी बीसीबीकडून सातत्याने केली जात आहे.
दरम्यान, आयसीसीच्या अलीकडील बोर्ड बैठकीत काही निर्णय बांगलादेशसाठी धक्कादायक ठरले. भारताऐवजी श्रीलंकेत सामने खेळवावेत, ही बांगलादेशची विनंती आयसीसीने स्पष्टपणे फेटाळली. इतकेच नव्हे तर 21 जानेवारी रोजी आयसीसीने बीसीबीला केवळ एका दिवसात अंतिम निर्णय कळवण्याची मुदत दिली होती. या निर्णयावर बांगलादेश माघार घेण्याच्या तयारीत नसून, आयसीसीशी संवाद सुरूच ठेवणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री इतके असहाय्य झाले आलेत का? उच्च न्यायालयाचे राज्य सरकारवर ताशेरे
बांगलादेशने माघार घेतल्यास संभाव्य परिणाम
-जर बांगलादेशने टी-20 विश्वचषकातून माघार घेण्याचा निर्णय घेतला, तर त्याचे परिणाम केवळ स्पर्धेपुरते मर्यादित राहणार नाहीत.
– आयसीसी टी-20 क्रमवारीत बांगलादेश संघाला मोठा फटका बसू शकतो. सामने न खेळल्यास रँकिंग पॉइंट्स मिळणार नाहीत, तर इतर संघांना फायदा होईल. याचा थेट परिणाम खेळाडूंच्या वैयक्तिक क्रमवारीवरही होण्याची शक्यता आहे.
-भारत आणि बांगलादेशमधील क्रिकेट संबंधांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. भविष्यात द्विपक्षीय मालिका रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जसे भारत-पाकिस्तान दरम्यान द्विपक्षीय सामने होत नाहीत, तशीच परिस्थिती भारत-बांगलादेश संबंधांमध्येही उद्भवू शकते.
-याशिवाय, बांगलादेशी खेळाडूंना आयपीएलपासून दूर ठेवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याआधी पाकिस्तानी खेळाडूंवर आयपीएलमध्ये बंदी घालण्यात आली होती, त्याच धर्तीवर बीसीसीआय कठोर भूमिका घेऊ शकते.
-आर्थिकदृष्ट्याही बीसीबीला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. स्पर्धेतून माघार घेतल्यास आयसीसीकडून मिळणारी सुमारे पाच लाख अमेरिकन डॉलर्सची सहभाग रक्कम गमावली जाईल. तसेच खेळाडूंना सामना शुल्क, बक्षीस रक्कम आणि कामगिरीवर आधारित मानधन मिळणार नाही.
-बीसीबीला अंतर्गत विरोधाचाही सामना करावा लागू शकतो. माजी कर्णधार तमीम इक्बाल यांनी यापूर्वीच या विषयावर समंजस निर्णय घेण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या मते, हा निर्णय केवळ सध्याच्या संघावर नव्हे तर भावी पिढ्यांवरही परिणाम करणारा ठरू शकतो.
-सर्वात महत्त्वाचे म्हणजे, विश्वचषकातून माघार घेतल्यास बांगलादेश क्रिकेट आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाकी पडण्याचा धोका आहे. आयसीसीमध्ये बीसीसीआयचा प्रभाव मोठा असल्याचे चित्र अलीकडील बैठकीत स्पष्ट झाले. स्थळ बदलाच्या प्रस्तावावर बांगलादेशला केवळ दोन मते मिळाली, तर भारताच्या भूमिकेला तब्बल चौदा सदस्यांचा पाठिंबा मिळाला.
