चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत ८ संघ अन् १५ सामने; कसा ठरणार विजेता?, चॅम्पियन्स ट्रॉफीचा फॉरमॅट काय?

  • Written By: Published:
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत ८ संघ अन् १५ सामने; कसा ठरणार विजेता?, चॅम्पियन्स ट्रॉफीचा फॉरमॅट काय?

Champions Trophy 2025 Format : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा येत्या १९ फेब्रुवारी सुरु होणार असून (Champions) वनडेतील सर्वोत्तम आठ संघ एकमेकांशी भिडण्यासाठी सज्ज आहेत. विशेष म्हणजे तब्बल ८ वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे पुनरागमन होत असल्याने क्रिकेट वर्तुळात उत्साह दिसून येत आहे. यापूर्वी २०१७ साली ही स्पर्धा झाली होती. त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळवण्यात आली नव्हती. पण आयसीसीने ही स्पर्धा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला.

Champions Trophy : बीसीसीआयचा धक्कादायक निर्णय; भारताच्या जर्सीवर दिसणार पाकिस्तानचं नाव

२०१७ साली विजेतेपद पटकावलेला पाकिस्तान २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफीचे मुख्य आयोजक आहे. मात्र, भारताने पाकिस्तानला जाण्यास नकार दिलेला असल्याने ही स्पर्धा हायब्रिड पद्धतीने खेळवण्यात येत आहे. त्यामुळे भारतीय संघ त्यांचे सर्व सामने दुबईत खेळणार आहे, तर इतर सर्व सहभागी संघांचे सामने पाकिस्तानमध्ये खेळवण्यात येणार आहेत.

आठ संघ कसे ठरले?

या स्पर्धेत भारत, पाकिस्तानसह, बांगलादेश, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान हे संघ सहभागी होत आहेत. हे आठ संघ २०२३ वनडे वर्ल्ड कपमधील अव्वल ८ संघ होते. त्यामुळे हेच ८ संघ चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा खेळण्यासाठी पात्र ठरले. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी २०२३ वनडे वर्ल्ड कप स्पर्धा ही पात्रता स्पर्धा होती. सहभागी आठ संघांची साखळी फेरीसाठी दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. अ गटात भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंड हे चार संघ आहेत. ब गटात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका हे चार संघ आहेत.

या आठ संघात होणाऱ्या या स्पर्धेत एकूण १५ सामने खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेचे स्वरुप २००६ पासून तसेच आहे. यावेळी त्याच स्वरुपात स्पर्धा खेळवली जाणार आहे. ४-४ च्या विभागलेल्या दोन गटात साखळी फेरी पार पडेल. साखळी फेरीत प्रत्येक संघ आपल्या गटातील संघांशी प्रत्येकी एक सामना खेळेल. त्यानंतर प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. या चार संघात दोन उपांत्य फेरीचे सामने अनुक्रमे ४ आणि ५ मार्च रोजी पार पडतील. त्यानंतर उपांत्य फेरीत विजय मिळवलेले दोन संघ अंतिम सामन्यात विजेतेपदासाठी खेळतील. म्हणजे अंतिम सामन्यात पोहणारे दोन संघ या स्पर्धेत एकूण ५ सामने खेळणार आहेत.

आत्तापर्यंतचे विजेते

ऑस्ट्रेलियाने २००६ आणि २००९ साली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. तसेच दक्षिण आफ्रिका (१९९८), न्यूझीलंड (२०००), श्रीलंका (२००२ संयुक्त), वेस्ट इंडिज (२००४) आणि पाकिस्तान (२०१७) या संघांनी प्रत्येकी एकदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.

१९९८ साली चालू झालेल्या या स्पर्धेचे आत्तापर्यंत ८ पर्व खेळवण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलिया आणि भारत या संघांनी प्रत्येकी २ वेळा विजेतेपद मिळवले आहे. भारताने एक विजेतेपद २००२ साली श्रीलंकेसोबत संयुक्तरित्या मिळवले आहे. पावसामुळे अंतिम सामना पूर्ण न झाल्याने हे संयुक्तपणे विजेतेपद मिळाले होते. दुसऱ्यांदा २०१३ साली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube