आज भारत-पाकिस्तान दुबईत येणार आमने-सामने; आजारी ऋषभ पंतच्या जागेवर कोण खेळणार?

IND vs PAK : चॅम्पियन्स ट्रॉफीतील आजचा सामना भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये होणार आहे. (IND vs PAK) हा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघांचा हा या स्पर्धेतील दुसरा सामना आहे. पण असं असलं तरी दोन्ही संघांसाठी वेगवेगळ्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे.
उपांत्य फेरीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकण्यासाठी भारताला या सामन्यात विजय गरजेचा आहे, तर पाकिस्तानला स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. त्यामुळे या सामन्यात रोमांच पाहायला मिळेल, अशी शक्यता आहे. दरम्यान, सामन्याच्या पूर्व संध्येला भारताचा उपकर्णधार शुभमन गिलने ऋषभ पंत आजारी असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे तो या सामन्यासाठी उपलब्ध नसेल. पण त्यामुळे भारताच्या प्लेइंग इलेव्हनला धक्का बसणार नाही. तो उपलब्ध नसल्याने केएल राहुलच यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळताना दिसणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्युझीलँडची विजयी सलामी! होम ग्राउंडवर पाकिस्तानला चारली पराभवाची धूळ
त्याचबरोबर मोहम्मद शमीनेही बांगलादेशविरुद्ध ५ विकेट्स घेत दमदार सुरुवात केली आहे. त्यामुळे तो संघात असेल. पण त्याच्यासोबत हर्षित राणाला कायम करणार की अर्शदीप सिंगला संधी दिली जाणार हे पाहावे लागणार आहे. याव्यतिरिक्त भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. फलंदाजी फळीत रोहित शर्मासह फॉर्ममध्ये असलेला गिलच मैदानात उतरेल. मधल्या फळीत विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, अक्षर पटेल असतील. तसेच रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्या हे अष्टपैलू फलंदाजीत सखोलता देतात.
पाकिस्तानला मात्र प्रमुख फलंदाज फखर जमान दुखापतीमुळे बाहेर झाल्याने धक्का बसला आहे. त्यामुळे त्यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करावा लागणार आहे. ते इमाम-उल-हकला संधी देऊ शकतात. तरी संघाची फलंदाजीची भिस्त बाबर आझम, कर्णधार मोहम्मद रिझवान यांच्यावर असणार आहे. त्यांना अन्य फलंदाजांकडूनही योगदानाची अपेक्षा असेल. गोलंदाजी फळीत पाकिस्तान तीन वेगवान गोलंदाजांसहच उतरण्याची शक्यता आहे.
सामन्याचे ठिकाण आणि वेळ
ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलने होत असल्याने भारताचे सामने दुबईत होत आहे. त्यामुळे पाकिस्तान संघ सामन्याच्या दोन दिवस आधीच दुबईत पोहोचला आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २.३० वाजता सुरुवात होईल, तर दुपारी २ वाजता नाणेफेक होईल.
संभावित प्लेइंग इलेव्हन
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, हर्षित राणा/अर्शदीप सिंग.
पाकिस्तान – इमाम-उल-हक, बाबर आझम, सौद शकिल, मोहम्मद रिझवान (कर्णधार/यष्टीरक्षक), सलमान आघा, तय्यम ताहिर, कुशदील शाह, शाहिन शाह आफ्रिदी, नसीम शाह, हॅरिस रौफ, अब्रार अहमद