Deepak Chahar च्या पत्नीला दिली जीवे मारण्याची धमकी

Deepak Chahar च्या पत्नीला दिली जीवे मारण्याची धमकी

मुंबई : भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहर (Deepak Chahar) याची पत्नी जया भारद्वाजबाबत (Jaya Bhardwaj) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. जयासोबत 10 लाखांची फसवणूक केल्याची घटना समोर आली असून तिला जीवे मारण्याच्या धमक्याही मिळाल्या आहेत.

रिपोर्ट्सनुसार, हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या एका माजी अधिकाऱ्याने त्यांच्यासोबत ही फसवणूक केली आहे. दीपक चहरच्या वडिलांनी याप्रकरणी माजी अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे संपूर्ण प्रकरण पैशाच्या व्यवहाराशी संबंधित आहे.

वास्तविक, जया यांनी व्यवसायासंदर्भात कोणाला तरी पैसे दिले होते. मात्र पैसे परत मागितल्यावर जीवे मारण्याच्या धमक्या आल्या. या प्रकरणी आता दीपक चहरचे वडील लोकेंद्र चहर यांच्या वतीने आग्रा येथे एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

जया यांना जीवे मारण्याची धमकी देणारी व्यक्ती हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे माजी अधिकारी आणि त्यांचा मुलगा आहे. जया यांनी या लोकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी 10 लाख रुपये दिल्याचे सांगितले जात आहे. पारीख स्पोर्ट्स अँड शॉपचे मालक घृव पारीख आणि त्याचे वडील कमलेश पारीख यांच्या भागीदारीत व्यवसाय करण्याच्या उद्देशाने त्यांनी ही रक्कम दिली.

मात्र, नंतर पैसे परत करण्याची मागणी केली असता कमलेश आणि त्याच्या मुलाने जयासोबत गैरवर्तन केले आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

दीपक चहरने गेल्या वर्षी 1 जून रोजी जया भारद्वाजसोबत लग्न केले होते. आयपीएल 2021 मध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या सामन्यानंतर दीपकने फिल्मी स्टाइलमध्ये गुडघ्यावर बसून जयाला लग्नासाठी प्रपोज केले. मात्र सध्या दुखापतीमुळे दीपक क्रिकेटपासून दूर आहे. तो गेल्या वर्षी आयपीएल 2022 मध्ये खेळू शकला नाही आणि ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 विश्वचषकात टीम इंडियाचा भाग होऊ शकला नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube