Women’s T20 World Cup: सराव सामन्यात Australia कडून भारतीय संघाचा पराभव
मुंबई : दक्षिण आफ्रिकेतील महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या मुख्य सामन्यांपूर्वी खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. सोमवारी झालेल्या सामन्यात भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियाकडून 44 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 130 धावांचे लक्ष्य ठेवले होते, मात्र भारतीय संघ 85 धावांत गारद झाला.
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत आठ गडी गमावून 129 धावा केल्या. बेथ मूनीने 28 धावा, ए गार्डनरने 22 धावा, जॉर्जिया वेअरहमने 32 धावा (17 चेंडू) आणि जे जॉन्सनने 22 धावा (14 चेंडू) केल्या. भारताकडून शिखा पांडे, पूजा वस्त्राकार आणि राधा यादव यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाच्या फलंदाजांनी पूर्णपणे निराश केले. शेफाली वर्मा, स्मृती मानधना यांच्यासह सर्वच फलंदाज फ्लॉप ठरले. शेफाली वर्माने दोन धावा केल्या, तर जेमिमा रॉड्रिग्स आणि स्मृती मानधना यांना खातेही उघडता आले नाही. रिचा घोषने पाच आणि यास्तिका भाटियाने सात धावांचे योगदान दिले. भारताचे सहा फलंदाज 50 धावांच्या आत बाद झाले.
हरलीन देओलने 12 धावांची खेळी केली. 61 धावांपर्यंत मजल मारताना भारताने नऊ विकेट गमावल्या. पूजा वस्त्राकरने नऊ, शिखा पांडे आणि राधा यादवने 01-01 धावा केल्या. दीप्ती शर्मा आणि अंजली सरवानी यांनी शेवटच्या विकेटसाठी 24 धावांची भागीदारी केली. भारतीय संघ 15 षटकांत 85 धावांवर गडगडला. ऑस्ट्रेलियाकडून डार्सी ब्राऊनने चार बळी घेतले, तर अॅशले गार्डनरला दोन यश मिळाले.
भारतीय संघ आपला पुढचा सराव सामना 8 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. महिला T20 विश्वचषक स्पर्धेत भारताला 12 फेब्रुवारीला पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे.