BCCI देणार रोहित शर्माला धक्का, श्रीलंका दौऱ्यात टीम इंडियाला मिळणार नवीन कर्णधार?
![BCCI देणार रोहित शर्माला धक्का, श्रीलंका दौऱ्यात टीम इंडियाला मिळणार नवीन कर्णधार? BCCI देणार रोहित शर्माला धक्का, श्रीलंका दौऱ्यात टीम इंडियाला मिळणार नवीन कर्णधार?](https://images.letsupp.com/wp-content/uploads/2024/07/Rohit-Sharma-1_V_jpg--1280x720-4g.webp)
India Tour Of Sri Lanka 2024 : झिम्बाब्वे दौऱ्यानंतर भारतीय संघ (Ind Vs Zim 2024) जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. श्रीलंका दौऱ्यावर (India Tour Of Sri Lanka 2024) भारतीय संघ तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय (BCCI) या दौऱ्यावर देखील जेष्ठ खेळाडूंना आराम देणार आहे. या दौऱ्यावर बीसीसीआय रोहित शर्मा (Rohit Sharma) , विराट कोहली (Virat Kohli) आणि जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) विश्रांती देणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे या दौऱ्यासाठी भारतीय संघाला नवीन कर्णधार मिळणार आहे.
नुकतंच टी20 वर्ल्ड कपनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी20 मधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे त्यांची श्रीलंकाविरुद्ध होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी संघात निवड होणार असल्याची चर्चा सुरु होती मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहला श्रीलंका दौऱ्यावर विश्रांती देणार आहे. जर असं झालं तर चाहत्यांना विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा थेट सप्टेंबर महिन्यात मैदानात दिसणार आहे.
भारतीय संघ सप्टेंबर महिन्यात बांगलादेश (Bangladesh) विरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळताना दिसणार आहे. भारतीय संघ सप्टेंबर ते जानेवारी 2025 पर्यंत 10 कसोटी सामने खेळणार आहे. तर पाकिस्तानमध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या (Champions Trophy 2025) आधी भारतीय संघ इंग्लडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी होणाऱ्या या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहलीला स्थान मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
तर दुसरीकडे बीसीसीआय श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाचा उपकर्णधार हार्दिक पंड्या किंवा केएल राहुलला भारतीय संघाचा कर्णधार म्हणून निवड करू शकते. येत्या काही दिवसात याबाबत बीसीसीआयकडून घोषणा होणार आहे. याच बरोबर या दौऱ्यासाठी भारतीय संघ देखील जाहीर होणार असल्याची चर्चा देखील सुरु झाली आहे.