तिरंदाजीत भारताची कमाल! मिक्स कंपाउंड टीम अमेरिकेत जिंकलं सुवर्णपदक

Archery World Cup : ज्योती सुरेखा वेन्नम आणि ऋषभ यादव या खेळाडूंच्या मिक्स कंपाउंड टीमने अटीतटीच्या सामन्यात सुवर्णपदकाची (Archery World Cup ) कमाई केली. अमेरिकेत सुरू असलेल्या वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात भारतीय संघाने ही सुवर्ण कामगिरी केली. या सामन्यात ज्योती वेनाम आणि ऋषभ यादव यांच्या टीमने चीनच्या हुआंग आय आणि चेन चिह लून यांचा पराभव केला.
वेन्नम आणि यादव या दोघांनी मिळून स्पर्धेतील स्टेज 1 मध्ये सुवर्णपदक जिंकले. या दोघांनी चीनी ताअपेचे हुआंग आय जो आणि चेन चीह लून यांचा 153-151 अशा फरकाने पराभव केला. अंतिम सेटमध्ये शानदार वापसी करत विजय मिळवला. या जोडीने पहिली आणि दुसरी सिरीज 37-38 आणि 38-39 ने गमावली होती. परंतु, नंतर तिसऱ्या सेटमध्ये त्यांनी जोरदार वापसी केली. 39-38 ने त्यांनी हा सेट जिंकला.
यानंतर भारतीय जोडीने चौथ्या आणि निर्णायक सेटमध्ये 39-39 असा विजय मिळवत एकूण स्कोअर 153-151 केला. याआधी ज्योती आणि ऋषभने स्लोवेनियाच्या खेळाडूंचा पराभव करुन भारतासाठी तिसरे पदक निश्चित केले होते. क्वालिफिकेशनमध्ये पाचव्या क्रमांकावर राहिलेल्या भारतीय जोडीने पहिल्या टप्प्यात स्पेन (156-149), क्वार्टर फायनलमध्ये डेन्मार्क (156-154) तर सेमी फायनलमध्ये स्लोवेनियाचा (159-155) पराभव केला होता.
Paris Olympics 2024 : दीपिका कुमारीने केली कमाल, तिरंदाजीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक
वेन्नमने फ्लोरिडातून इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की मला असं वाटलं नव्हतं की हा ऑलिम्पिकचा इव्हेंट आहे. या स्पर्धेत सर्वश्रेष्ठ योगदान द्यायचं आणि सामन्याच्या शेवटपर्यंत लढायचं हेच आम्ही ठरवलं होतं. आता हा ऑलिम्पिक इव्हेंट बनलाय म्हटल्यानंतर कंपाउंड तिरंदाजीवर सगळ्यांचं लक्ष राहणार आहे. सुवर्णपदक जिंकून सिझनची सुरुवात झाली याचा मला आनंद आहे.