IND vs NZ: न्यूझीलंडला व्हाईटवॉश! भारत क्रमवारीत अव्वलस्थानी
इंदूर : तिसऱ्या एकदिवसीय (Third ODI) सामन्यात भारताने न्यूझीलंडवर (New Zealand) 90 धावांनी विजय मिळवत मालिकेत 3-0 असा व्हाईटवॉश दिलाय. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुबमन गिल (Shubman Gill) यांच्या शतकांच्या जोरावर भारताने 50 षटकात 385 धावांचे आव्हान दिले होते.
भारतीय संघाने श्रीलंकेनंतर आता न्यूझीलंडवरही 3-0 असा विजय मिळवला आहे. भारताने सलग सहा वडने सामने जिंकले आहेत. भारताने न्यूझीलंडवर तिसऱ्या वनडे सामन्यात 90 धावांनी दमदार विजय मिळवला. या विजयासह भारताने ही मालिका 3-0 अशी जिंकली आहे.
शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी संघाला तुफानी सुरुवात करून दिली. गिलने 72 चेंडूत शतक पूर्ण केले. तो 112 धावा करून बाद झाला.
दुसरीकडे रोहितनेही या सामन्यात तब्बल तीन वर्षांनी शतक झळकावले. रोहितने आपल्या शतकी खेळीत 6 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने 101 धावा केल्या. रोहितने वनडेमध्ये शेवटचे शतक 19 जानेवारी 2020 मध्ये झळकावले होते.
हार्दिक पंड्याने अर्धशतक झळकावले आणि भारताची धावगती वाढवली. त्यानंतर शार्दुल ठाकूरनेही 25 धावांची दमदार खेळी साकारली. त्यामुळे भारताला न्यूझीलंडला 386 धावांचे आव्हान देता आले.
भारताच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडला 41.2 ओव्हरमध्ये 295 धावांवर ऑलआऊट केलं. न्यूझीलंडकडून डेव्हॉन कॉनवेने सर्वाधिक 138 धावांची खेळी केली. तर हेनरी निकोलसने 42 रन्स केल्या. या दोघांव्यतिरिक्त भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना मैदानात फार टिकू दिलं नाही.
भारताकडून शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादवने 3-3 बळी घेतले. तर युझवेंद्र चहलने 2 विकेट घेतल्या. हार्दिक पांड्या आणि उमरान मलिक यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
भारतीय संघ आता एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहचला आहे. आधीच टी-20 मध्ये भारतीय संघ अव्वलस्थानावर आहे. कसोटी क्रमवारीत भारत दुसऱ्या स्थानी आहे.