मोठी बातमी! IPL 2025 पंजाब आणि दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबला

IPL 2025 : भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरु असणाऱ्या तणावादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, आयपीएल 2025 मध्ये पंजाब आणि दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबला आहे. माहितीनुसार, फ्लडलाइट्सच्या समस्येमुळे सामना थांबवण्यात आला आहे.
सामना थांबवला तेव्हा पंजाबच्या डावातील 11 वे षटक टाकले जात होते. अचानक खेळ थांबला आणि पंचांनी खेळाडूंना मैदान सोडण्यास सांगितले. यानंतर मैदानावरील फ्लडलाइट्स विझवण्यात आले आणि प्रेक्षकांना बाहेर करण्यात आले आहे.
तर दुसरीकडे काही वेळापूर्वी पाकिस्तानने जम्मूपासून जैसलमेरपर्यंत अनेक शहरांवर हल्ला केला आहे. भारतीय सैन्याने सर्व हल्ले यशस्वीरित्या हाणून पाडले आहेत. या हल्ल्यांनंतर, सीमेवर असलेल्या विविध शहरांमध्ये ब्लॅकआउट घोषित करण्यात आले आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ला केला होता. भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तानने 7 आणि 8 मे च्या रात्री भारताच्या 15 शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता मात्र भारतीय लष्कराने या सर्व हल्ल्यांना भारताच्या इंटिग्रेटेड काउंटर यूएएस ग्रिड आणि एअर डिफेन्स सिस्टमने यशस्वीरित्या निष्प्रभ केले.
अवंतिपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नाल, फाळोदी, उत्तरलाई आणि भुज यांसारख्या उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी ठिकाणांवर ड्रोन व क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.