IND vs AUS: एका वर्षात तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावून शुबमन गिलने ‘या’ दिग्गजांशी बरोबरी साधली

  • Written By: Published:
IND vs AUS: एका वर्षात तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावून शुबमन गिलने ‘या’ दिग्गजांशी बरोबरी साधली

अहमदाबाद : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबाद येथे खेळल्या जात असलेल्या चौथ्या कसोटीत शुबमन गिलने आपल्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले आहे. या सामन्यात त्याने 12 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 128 धावांची खेळी केली. या शतकासह गिल अनुभवी खेळाडूंच्या विशेष यादीत सामील झाला आहे. 2023 मध्ये गिलने आतापर्यंत तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावले आहे. एका वर्षात कसोटी, एकदिवसीय आणि T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतक झळकावणारा गिल हा चौथा भारतीय आणि जगातील 10वा फलंदाज ठरला आहे.

या आगोदर श्रीलंकेचा माजी फलंदाज महेल जयवर्धनेने 2010 मध्ये पहिल्यांदा हा पराक्रम केला होता. यानंतर सुरेश रैना अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय आणि जगातील दुसरा फलंदाज ठरला. रैनाने 2010 मध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये शतके झळकावली होती. यानंतर ही यादी हळूहळू वाढत गेली आणि आता ती शुबमन गिलपर्यंत पोहोचली आहे. गिलने 2023 मध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक केले आहे.

विशेष म्हणजे या वर्षी न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात गिलने द्विशतक झळकावले होते. 18 जानेवारी 2023 रोजी हैदराबादमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात त्याने 19 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने 208 धावांची खेळी केली होती.

गिलने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 14 कसोटी, 21 एकदिवसीय आणि 6 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 30.48 च्या सरासरीने 762 धावा, एकदिवसीय सामन्यात 73.76 च्या सरासरीने 1254 धावा आणि T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 40.40 च्या सरासरीने आणि 165.57 च्या स्ट्राईक रेटने 202 धावा केल्या आहेत.

वर्षभरात तिन्ही फॉरमॅटमध्ये शतके झळकावणारे फलंदाज

महेला जयवर्धने – 2010
सुरेश रैना – 2010
तिलकरत्ने दिलशान – 2011
अहमद शहजाद – 2014
तमीम इक्बाल – 2016
केएल राहुल – 2016
रोहित शर्मा – 2017
डेव्हिड वॉर्नर – 2019
बाबर आझम – 2022
शुबमन गिल -2023

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube