आशिया कपची ट्रॉफी भारताला द्यावीच लागणार; पाकिस्तानच्या नक्वीवाला बीसीसीआयचा थेट इशारा
बीसीसीआयनं एसीसी अध्यक्ष मोहसीन नक्वी यांना एक अधिकृत ई-मेल पाठवून विजेत्या संघाला ट्रॉफी लवकरात लवकर सोपवावी असं म्हटलं.

आशिया कपच्या फायनलमध्ये भारतानं पाकिस्तानला पराभूत करत स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं होतं. मात्र, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वातील टीम इंडियानं पीसीबी अध्यक्ष आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे ध्यक्ष मोहसीन नक्वीच्या (BCCI) हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. यानंतर मोहसीन नक्वी ट्रॉफी घेऊन दुबईच्या हॉटेलमध्ये घेऊन गेले होते. मोहसीन नक्वी यांनी सूर्यकुमार यादवनं एसीसीच्या ऑफिसमध्ये येऊन ट्रॉफी घेऊन जावं असं म्हटलं.
बीसीसीआयनं एसीसी अध्यक्ष मोहसीन नक्वी यांना एक अधिकृत ई-मेल पाठवून विजेत्या संघाला ट्रॉफी लवकरात लवकर सोपवावी असं म्हटलं आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया म्हणाले आम्ही एसीसीला पत्र लिहिलं आहे आणि ट्रॉफी विजेत्या संघाला दिली जावी, असं म्हटलंय. आम्ही त्यांच्या उत्तराची वाट पाहतोय. जर प्रतिसाद आला नाही किंवा नकारात्मक उत्तर आल्यास आयसीसीला पत्र लिहिणार असल्याचं देवजीत सैकिया म्हणाले. आम्ही एक एक पाऊल पुढं जातोय, असंही सैकिया म्हणाले आहेत.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 2 सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा; ऋषभ पंतला मिळाली मोठी जबाबदारी
देवजीत सैकिया यांनी स्पष्ट केलं की जर मोहसीन नक्वी ट्रॉफी देण्यास तयार झाले नाहीत तर बीसीसीआय कठोर कारवाई करेल. जर आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळाली नाही तर बीसीसीआय आयसीसीला पत्र लिहिणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वातील टीम इंडियानं आशिया कपच्या फायनलमध्ये पाकिस्तानला 5 विकेटनं पराभूत केलं होतं. भारतीय खेळाडूंनी पहिल्यांदा स्पष्ट केलेलं की तो मोहसीन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार नाहीत. भारतानं एमिरेटस क्रिकेट बोर्डाच्या उपाध्यक्षांनी ट्रॉफी द्यावी अशी मागणी केली होती.
मोहसीन नक्वी यांनी भारताची ही अट मान्य करण्यास नकार दिला. मॅच जिंकल्यानंतर भारतीय खेळाडू जवळपास एक तास मैदानावर वाट पाहत राहिले मात्र तिढा सुटला नाही. मोहसीन नक्वी आशिया कपची ट्रॉफी घेऊन निघून गेले. तर भारतीय संघानं प्रतिकात्मक जल्लोष केला. आशिया कपमध्ये भारतानं पाकिस्तानला तीन वेळा पराभूत केलं होतं.