आज भारतीय क्रिकेटसाठी मोठा दिवस; नवीन कसोटी कर्णधाराची होणार घोषणा

India Test Captain : जून महिन्यात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर (ENGvsIND) जाणार आहे. या दौऱ्यासाठी आज भारतीय संघाची घोषणा होणार आहे. तसेच आज भारताच्या नव्या कसोटी कर्णधाराच्या नावाची देखील घोषणा आज करण्यात येणार आहे. यासाठी आज दुपारी 1.30 वाजता मुंबईत (Mumbai) पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. भारतीय संघ 20 जूनपासून इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. ही मालिका 2025-27 च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असल्याने दोन्ही संघासाठी महत्वाची आहे.
तर दुसरीकडे कसोटी क्रिकेटमधून विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्माने (Rohit Sharma) निवृत्ती जाहीर केल्याने इंग्लंड दौऱ्यासाठी बीसीसीआय (BCCI) कोणत्या खेळाडूंना संधी देणार याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून आहे.
अजित आगरकर-गौतम गंभीर पत्रकार परिषद घेणार
टीम इंडियाच्या निवड समितीचे अध्यक्ष अजित आगकर (Ajit Agarkar) आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आज दुपारी 1.30 वाजता मुंबईत पत्रकार परिषदेत संघाची आणि नवीन कर्णधाराची घोषणा करणार आहे. माहितीनुसार, कर्णधाराच्या शर्यतीत शुभमन गिल आघाडीवर आहे. तसेच या पदासाठी स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या नावाचा देखील विचार करण्यात येत आहे. तर उपकर्णधार म्हणून ऋषभ पंतचे नावही पुढे आले आहे.
या खेळाडूंना संधी?
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय संघात इंग्लंड दौऱ्यासाठी काही बदल पाहायला मिळणार आहे. या दौऱ्यासाठी निवड समिती युवा खेळाडूंना संधी देण्याचा विचार करत आहे. त्यामुळे साई सुदर्शन आणि करुण नायर यांना या दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
iphone नंतर Samsung फोनही अमेरिकेत होणार महाग, ट्रम्प यांची मोठी घोषणा
तसेच सरफराज खान आणि नितीश कुमार रेड्डी यांना पुन्हा संधी मिळू शकते. तर फिटनेसमुळे मोहम्मद शामीबाबत विचार होण्याची शक्यता आहे. अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि आकाश दीप या वेगवान गोलंदाजांचा संघात समावेश करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.