खाशाबा जाधव यांना गुगलकडून अनोखी मानवंदना; संभाजीराजेंकडून सरकारला सवाल

  • Written By: Published:
खाशाबा जाधव यांना गुगलकडून अनोखी मानवंदना; संभाजीराजेंकडून सरकारला सवाल

पुणे : देशाला पहिलं वैयक्तिक ऑलिंपिक पदक जिंकून देणारे, सातासमुद्रापार देशाचा तिरंगा डौलाने फडकावणारे मराठमोळे पैलवान स्वर्गीय खाशाबा जाधव यांना गुगलने अनोखी मानवंदना दिली आहे. खाशाबा जाधव यांच्या 97व्या जयंतीनिमित्त गुगलने त्यांना डुडलवर स्थान दिलं आहे. कुस्तीमध्ये ऑलिम्पिक पदक मिळवणारे स्वतंत्र हिंदुस्थानातील पहिले मल्ल अशी खाशाबा जाधव यांची ख्याती आहे.

ऑलिंपिकवीर पै. खाशाबा जाधव यांची १५ जानेवारी रोजी जयंती आहे. जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याची गुगुलने दखल घेत त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

खाशाबा जाधव हे स्वतंत्र भारतातील पहिले ऑलिंपिक पदक विजेते कुस्तीगीर होते. सन १९५२ साली त्यांनी हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये फ्री स्टाईल कुस्तीत कांस्यपदक मिळवले. हे भारतासाठी स्वातंत्र्योत्तर काळातले पहिले वैयक्तिक पदक होते. खाशाबा जाधव यांनी १९४८ साली लंडन उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये फ्लायवेट वजनगटातील कुस्तीत सहावा क्रमांक मिळवला होता.

खाशाबा जाधव यांचा जन्म १५ जानेवारी १९२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामध्ये कराड तालुक्यातील गोळेश्वर खेड्यात झाला. कुस्ती खेळात त्यांची परिसरात ख्याति होती. देशात ऑलिंपिकमध्ये पदक जिंकणारे ते पहिले खेळाडू होते. त्यांच्या जयंतीनिमित्त गुगलकडून मानवंदना दिली आहे.

गुगलने दखल घेतली पण सरकारने नाही !

गुगलच्या या सन्मानानंतर युवराज संभाजीराजे यांनी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडियावर गुगलने दखल घेतली पण सरकारने नाही, अशा शब्दात टीका केली आहे.

संभाजीराजे यांनी पुढे लिहले आहे की, “१९५२ साली भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे पैलवान खाशाबा जाधव यांची आज जयंती. या निमित्त गुगलने खास डूडल तयार करून त्यांना अभिवादन केले आहे. मात्र त्यांच्या कार्याला उचित सन्मान देण्यासाठी सरकार केव्हा जागे होणार, हाच प्रश्न आहे!”

मी खासदार असताना २०१७ ते २०२२ अशी सहा वर्षे सलग, खाशाबांना मरणोत्तर “पद्मविभूषण” मिळावा, यासाठी केंद्रात सर्व पातळीवर वारंवार पाठपुरावा केला, मात्र शेवटी उपेक्षाच झाली. आता तरी सरकारने जागे व्हावे. या महान मल्लावर ऑलिम्पिकच्या मैदानातही अन्याय झाला होता, तरीदेखील देशासाठी पहिले ऑलिम्पिक पदक जिद्दीने जिंकून आणणाऱ्या खाशाबा जाधव यांना “पद्म” पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा उचित गौरव करणे, हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल..

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube