शाब्बास पोरींनो : खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ अंतिम फेरीत

  • Written By: Published:
शाब्बास पोरींनो : खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ अंतिम फेरीत

जबलपूर : फॉर्ममध्ये असलेल्या रेडर हरजित, यशिका पुजारी (Yashika Pujari), मनीषा आणि समृद्धी यांनी अप्रतिम खेळीतून महाराष्ट्र महिला कबड्डी संघाला खेलो इंडिया यूथ गेम्सच्या (Khelo India Youth Games) फायनलचे तिकीट मिळवून दिले. महाराष्ट्र संघाच्या युवा कर्णधार असलेल्या निकिताच्या कुशल नेतृत्वात महाराष्ट्र महिला कबड्डी संघाने (Maharashtra Women’s Kabaddi Association) अंतिम फेरीचा पल्ला गाठला. गत रौप्य पदक विजेत्या महाराष्ट्र महिला संघाने बुधवारी उपांत्य लढतीत हिमाचल प्रदेशवर १२ गुणांनी विजयाची नोंद केली. महाराष्ट्र संघाने ४४-३१ अशा फरकाने सेमी फायनलमध्ये एकतर्फी विजय संपादन केला.

या लक्षवेधी कामगिरीच्या बळावर महाराष्ट्र संघाला दुसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश निश्चित करता आला. मुख्य प्रशिक्षक गीता साखरे यांचे मार्गदर्शन आणि निकिताच्या कुशल नेतृत्व यातून महाराष्ट्र संघ आता चॅम्पियन होण्यासाठी सज्ज झाला आहे. यासाठी महाराष्ट्राला अंतिम सामन्यात हरियाणा विरुद्ध विजय संपादन करावा लागणार आहे. गुरुवारी हरियाणा आणि महाराष्ट्र यांच्यात फायनल रंगणार आहे. सलग दुसऱ्यांदा हे दोन्ही संघ फायनलमध्ये आमनेसामने येत आहेत.

Jayant Patil : या लोकांनी महाराष्ट्राचा बिहार केलाय, शिंदे-फडणवीसांवर टीकास्र

राष्ट्रीय खेळाडू हरजीत, यशिका आणि मनीषा यांनी आपल्या दर्जेदार कामगिरीत सातत्य ठेवत महाराष्ट्र संघाला मोठा विजय मिळवून दिला. आक्रमक खेळीतून महाराष्ट्र संघाने पहिल्या हाफमध्येच आघाडी घेत विजयाचे संकेत दिले. यादरम्यान निकिता, समृद्धी आणि हरजीत यांनी अचूक पकडीतून हिमाचल प्रदेशचा विजयाचा प्रयत्न हाणून पाडला.

हरियाणाला पराभवाची परतफेड करत चॅम्पियन होणार महाराष्ट्र

महाराष्ट्र महिला संघाला आता किताब जिंकण्याची मोठी संधी आहे. याच सोनेरी यशापासून महाराष्ट्राचा संघ अवघ्या एका पावलावर आहे. आता महाराष्ट्र संघ फायनलमध्ये हरियाणाला नमवून चॅम्पियन होण्यासाठी सज्ज झाला आहे. गुरुवारी महिला गटाच्या फायनलमध्ये महाराष्ट्र आणि हरियाणा संघ समोरासमोर असतील. गत सत्रामध्ये हरियाणा संघाने फायनलमध्ये महाराष्ट्राचा पराभव केला होता.

संघाला सोनेरी यश मिळवून देणार : निकिता

महाराष्ट्र संघातील प्रत्येक खेळाडूने सर्वोत्तम कामगिरी करत संघाची किताब जिंकण्याची आशा कायम ठेवली आहे. या दरम्यान रेडर हरजित, यशिका, मनीषा यांची कामगिरी लक्षवेधी ठरली. त्यामुळे आम्हाला फायनल गाठण्याचा पराक्रम गाजवता आला. आता महाराष्ट्र संघाला ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवून देण्यासाठी उत्सुक आहे, अशा शब्दात कर्णधार निकिताने आपला निर्धार व्यक्त केला.

डावपेच फत्ते करत गाठली फायनल : प्रशिक्षक गिता साखरे

पहिल्यांदाच चॅम्पियन होण्यासाठी उत्सुक असलेल्या महाराष्ट्र संघाने आखून दिलेले सर्व डावपेच फत्ते केले. त्यामुळे महाराष्ट्र संघाला अंतिम फेरीचा पल्ला गाठता आला. उपांत्य सामन्यातील धडाकेबाज विजयाने महाराष्ट्र महिला खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे संघ आता निश्चितपणे किताबाचा बहुमान मिळेल, असा विश्वास मुख्य प्रशिक्षक गीता साखरे यांनी व्यक्त केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube