IND VS NZ : विराट कोहली आणि शुभमन गिल नवा विक्रम रचणार?
हैदराबाद : भारतीय क्रिकेट संघ आज (बुधवार) हैदराबाद येथे 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाहुणे न्यूझीलंड (IND vs NZ) विरुद्ध खेळणार आहे. हा सामना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि शुभमन गिल याच्यासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात दोन्ही फलंदाज आपल्या नावावर मोठे विक्रम नोंदवू शकतात. त्याचवेळी टॉम लॅथमच्या नेतृत्वाखालील किवी संघ 34 वर्षांपासून भारतात वनडे मालिका जिंकण्याची वाट पाहत आहे. मात्र, टीम इंडियाला मैदानावर पराभूत करणे सोपे नाही.
नव्या वर्षात जबरदस्त फॉर्ममध्ये दिसणारा विराट कोहली पहिल्या वनडेत ११९ धावांची इनिंग खेळून सचिन तेंडुलकर, कुमार संगकारा, रिकी पाँटिंग, महेला जयवर्धने आणि जॅक कॅलिस यांसारख्या दिग्गज फलंदाजांच्या यादीत सामील झाला. कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25 हजार धावांच्या आकड्यापासून 119 धावा दूर आहे. त्याने आतापर्यंत 487 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 24881 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 74 शतके झळकावली आहेत.
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकरने 664 सामन्यांमध्ये 34357 आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत तर संगकाराने 594 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 28016 धावा केल्या आहेत. पाँटिंगने 560 सामन्यांमध्ये 27483 धावा केल्या आहेत तर कॅलिसने 519 सामन्यांमध्ये 25534 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक शतकांबद्दल बोलायचे झाले तर सचिन 100 शतकांसह पहिल्या तर कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. पाँटिंगची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 71 शतके आहेत.
शुभमन गिलला कोहली आणि धवनला मागे सोडण्याची संधी आहे. शुभमन गिलकडे एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 1 हजार धावा करणारा भारतीय फलंदाज बनण्याची सुवर्ण संधी आहे. गिलने 18 डावात 894 धावा केल्या आहेत. तो विराट कोहली आणि शिखर धवनला मागे टाकू शकतो. ही कामगिरी करण्यासाठी गिलला 106 धावांची गरज आहे. याआधी कोहली आणि शिखरने एकाच 24-24 डावात 1 हजार वनडेमध्ये धावा केल्या आहेत.
भारताने घरच्या मैदानावर किवी संघाविरुद्ध 6 एकदिवसीय मालिका खेळली आहे. न्यूझीलंडचा संघ 34 वर्षांपासून भारतात वनडे मालिका जिंकण्याची वाट पाहत आहे. यादरम्यान, दोन्ही संघ 6 एकदिवसीय मालिकेत भिडले आहेत, परंतु पाहुण्या संघाला कधीही मालिका जिंकता आलेली नाही. किवी संघाने 2017-18 मध्ये भारतामध्ये यजमानांसोबत शेवटची वनडे मालिका खेळली होती तेव्हा त्यांना 1-2 ने पराभव पत्करावा लागला होता.