अधिवेशनादरम्यान विधिमंडळाच्या गेटवर आत्मदहनाचा प्रयत्न
नागपूर : नागपूरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विधिमंडळाच्या गेटवर एका महिलेने स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षारक्षकांना वेळीच हा प्रकार लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. महिलेने केलेल्या आत्मदहनाच्या प्रयत्नामुळे विधिमंडळ परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
उठसूट कुणीही संतांचा तसेच महापुरुषांचा अपमान करत आहेत. यावर सरकार काहीही करत नाही, याचा राग व्यक्त करण्यासाठी महिलेने स्वतःच्या अंगावर रॉकेल घेतले. कविता चव्हाण असे या महिलेचे नाव असून त्या सोलापूर येथील रहिवासी आहेत. या घटनेमुळे विधिमंडळ परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
दुसरीकडे आज नागपूरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. या दिवशी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरल्याचं दिसून आलं. यावेळी विरोधकांनी विधानभवनाच्या पायर्यांवर उतरत जोरदार घोषणाबाजी केली. तसेच महाविकास आघाडीच्या आमदारांनी काळ्या पट्टया बांधून सरकारचा निषेधही केला.
तसेच विरोधकांकडून एनआयटी भूखंड प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. तर, दुसरीकडे सत्ताधारी आमदारांनी दिशा सालियान आत्महत्या प्रकरणी चौकशीची मागणी लावून धरली होती. दोन्ही बाजूंकडून गदारोळ सुरू असल्याने विधानसभेचे कामकाज काही वेळेस स्थगित करण्यात आले होते.