राज्यात पाच उपमुख्यमंत्री असावे, देवाला आनंद होईल; बच्चू कडूंची सरकारवर खोचक टीका
Bachchu Kadu : सध्या राज्याला एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री लाभल्याने अनेक पेच निर्माण होतांना दिसत आहे. आता पंढरपूरच्या विठुरायाच्या महापूजेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कार्तिकी यात्रेची पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होते असते. मात्र, राज्यात दोन उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळं यंदा विठ्ठलाची होणारी शासकीय पूजा अजित पवार (Ajit Pawar) करणार की देवेंद्र फडणवीस? (Devendra Fadnavis) याबाबतचा निर्णय न्याय आणि विधी विभाग करणार आहे. दरम्यान, आता प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी जोरदार टोला लगावला.
आमदार बच्चू कडू म्हणाले, राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शासकीय पूजेला जावे. दोन उपमुख्यमंत्री शासकीय पूजेला येत असल्याने देवाला किती आनंद होईल. मी म्हणतो की राज्यात पाच उपमुख्यमंत्री असावेत आणि या पाचही उपमुख्यमंत्र्यांनी शासकीय पूजेला जावे. कारण हिंदू धर्मात पाच आकड्याला विशेष महत्त्व आहे. ते म्हणाले, राज्यात पाच उपमुख्यमंत्री केल्यानंतर मुख्यमंत्रीही दोन करावेत. राज्याला सध्या दोन मुख्यमंत्र्यांची गरज आहे. एक सार्वजनिक कामांसाठी तर एक व्यक्तिगत कामांसाठी. आता व्यक्तिगत कामांसाठी एका मुख्यमंत्र्यांची गरज आहे, असा खोचक टोला त्यांनी लगावला.
बच्चू कडू हे सातत्याने भाजपवर हल्लाबोल करत आहे. काही दिवसांपूर्वीच माझ्या जिल्ह्यात मला भाजपचा त्रास आहे, असं विधान केलं होतं. आता पुन्हा एकदा त्यांनी भाजपला टार्गेट केलं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून शिंदे-फडणवीसांसोबत सत्तेत सहभागी झालेले अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नुकतेच एक विधान केलं. अजित पवारांना मुख्यमंत्री बनवायचे असेल तेव्हा त्यांना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री करू. जेव्हा संधी मिळेल, तेव्हा त्यांनी सीएम करू, असं फडणवीस म्हणाले होते.
यावर बोलतांना बच्चू कडू म्हणाले, एकीकडे आगामी निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढणार आणि दुसरीकडे अजित पवारांना मुख्यमंत्री करू बोलतात, हे कसे ? फ़डणवीसांच्या मनात काय आहे, हे सांगता येत नाही. शिंदेच्या नेतृत्वात लढणार आणि सीएम अजित पवारांना करणार असतील, तर मोठा संभ्रम आहे. ज्याच्या नेतृत्वात लढतो, त्याला मुख्यमंत्री केले जाते, पण इथं उलटं होतंचय. निवडणूक कोणाच्या नेतृत्वाखाली लढवायची हे भाजप ठरवते आणि मुख्यमंत्री कोण होणार हेही तेच ठरवणार. त्यापेक्षा सगळे पक्ष भाजपात विलीन करा, हाच चांगला मार्ग आहे, असं कडू म्हणाले.