ऐकावं ते नवलच! पिल्लं हुबेहूब तुमच्या बोक्यासारखीच; मजा मारलेल्या बोक्यामुळे शेजाऱ्यांत तुफान राडा

Cat Kittens Paternity Dispute पैशांसाठी नाही, तर मांजर आणि बोक्याच्या 'लव्ह अफेअर'मुळे शेजारी पोहोचले थेट पोलीस ठाण्यात

  • Written By: Published:
ऐकावं ते नवलच! पिल्लं हुबेहूब तुमच्या बोक्यासारखीच; मजा मारलेल्या बोक्यामुळे शेजाऱ्यांत तुफान राडा

Cat Kittens Paternity Dispute : जगात भांडण करण्यासाठी कुठलं कारण पुरतं? कुणी म्हणेल पैसा, कुणी म्हणेल जमीन… पण बंगळुरूमध्ये चक्क ‘मांजराच्या पिल्लांच्या बापावरून’ दोन कुटुंबांत राडा झालाय. हा वाद इतका वाढला आणि थेट ॲसिड हल्ल्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. या घटनेची सुरुवात तेव्हा झाली, जेव्हा एका स्थानिक रहिवाशाच्या बोक्यामुळे शेजाऱ्याची मांजर गाभण राहिली. त्या मांजरीने चार पिल्लांना जन्म दिल्यानंतर दोन्ही कुटुंबांतील तणाव चांगलाच वाढला. काय आहे हे अजब ‘मांजर-पुराण’? ज्याची सध्या बंगळुरूमध्ये जोरदार चर्चा सुरूये. ते जाणून घेऊया…

तर, बंगळुरूच्या शेषाद्रीपुरममध्ये दोन शेजारी राहतात. एकाकडे मांजर आहे, तर दुसऱ्याकडे आहे देखणा बोका. आता निसर्गनियमाप्रमाणे या दोघांचं सूत जुळलं आणि मांजरीने चार गोंडस पिल्लांना जन्म दिला. पण ही आनंदाची बातमी शेजाऱ्यांसाठी मात्र ‘डोकेदुखी’ ठरली. प्रकाशित पोस्टनुसार, मांजरीचा मालक जन्माला आलेली पिल्लं घेऊन शेजाऱ्याच्या दारात पोहोचला आणि हे बघा, ही पिल्लं हुबेहूब तुमच्या बोक्यासारखी दिसतात असे सांगत “तुमचा बोका या पिल्लांचा बाप असल्याने, आता या पिल्लांचा सांभाळ तुम्हालाच करावा लागेल.” असे ठणकाऊन सांगितले. इथूनच दोघांमध्ये वादाचं ‘म्याऊ-म्याऊ’ सुरू झालं.

बोक्याच्या मालकाने जबाबदारी घ्यायला नकार देताच मांजरीचा मालक खवळला. त्याने चारही पिल्लं उचलली आणि शेजाऱ्याच्या दारात ‘डिलीव्हरी’ केल्यासारखी फेकून दिली. वाद इतका विकोपाला गेला की, मांजरीच्या मालकाने शेजाऱ्याला चक्क ॲसिड फेकण्याची धमकी दिली. बिचारी पिल्लं आई विना पोरकी झाली आणि गल्लीत भटकू लागली, तर तिकडे मांजरीची पिल्लांसाठी व्याकुळ होऊन रडारड सुरू झाली.

शेवटी मामला ‘ॲसिड’ अटॅकपर्यंत पोहोचल्यावर पोलिसांनी एन्ट्री घेतली. आता शेषाद्रीपुरम पोलिसांसमोर “पिल्लांचा बाप कोण?” आणि “त्यांना सांभाळणार कोण?” असा पेच उभा ठाकला. चांगलाच हायव्होल्टेज ड्रामा रंगल्यानंतर शेवटी पोलिसांनी व्यावहारिक आणि शांततापूर्ण तोडगा काढला. कोणत्याही एका कुटुंबाला पिल्लांची जबाबदारी घेण्यास भाग पाडण्याऐवजी, अधिकाऱ्यांनी मांजरीची पिल्ले एका त्रयस्थ व्यक्तीकडे सोपवण्याची व्यवस्था केली. या कल्पक तडजोडीमुळे परिस्थिती निवळली आणि हा विचित्र वाद यशस्वीपणे मिटवला. सध्या पोलिसांनी जरी हा वाद मिटवला असला तरी, पूर्ण बंगळुरूमध्ये या अजब पिल्लांच्या ‘पॅटर्नल’ वादाची शहरभर जोरदार चर्चा सुरूये.

follow us