Rupali Chakankar : हिरकणी कक्ष कागदावर नको, महिला आयोगाच्या अध्यक्ष संतापल्या

Rupali Chakankar : हिरकणी कक्ष कागदावर नको, महिला आयोगाच्या अध्यक्ष संतापल्या

अहमदनगर : सरकारी आणि खासगी आस्थापनामध्ये हिरकणी कक्ष असावा ही कायद्यामध्ये तरतूद आहे. मात्र पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा हिरकणी कक्ष नाही. केवळ कागदावरती असणाऱ्या हिरकणी कक्षाचा स्तनदा मातांसाठी उपयोग होत नाही. आमदार सरोज अहिरे यांच्याबाबत जे घडल त्यासंदर्भात तेव्हा राज्य महिला आयोगाच्या वतीने  विधान भवनातील कामकाज मंत्री यांना पत्र पाठवलेल आहे, असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हंटलंय. त्या अहमदनगर येथे बोलत होत्या.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नाशिकच्या देवळाली मतदार संघाच्या आमदार सरोज अहिरे (MLA Saroj Ahire) या आपल्या बाळासह विधानभवनात दाखल झाल्या होत्या. अहिरे या हिरकणी कक्षाकडे आपल्या बाळाला घेऊन जात असतांना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. मात्र, त्यावेळी हिरकणी कक्षाची दुरावस्था पाहून त्या अधिवेशनातून माघारी निघाल्या.

अहेरांनी उणीवावर बोट ठेवले, आरोग्यमंत्र्यांना आली जाग

सरोज अहिरे या नागपूर येथे झालेल्या अधिवेशनात लहान बाळाला घेऊन आल्या होत्या. त्यामुळे संपूर्ण राज्यासह देशभरात त्यांची चर्चा झाली. त्यावेळी अनेकांनी त्यांचे कौतुक केले होते. याच दरम्यान सरोज अहिरे यांना भेटून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनेही त्यांचे कौतुक केले होते. त्यांच्यासाठी हिरकणी कक्ष सुरु करत असल्याची घोषणा केली होती. तेव्हा त्यांच्यासाठी हिरकणी कक्षाची व्यवस्था करण्यात आली होती.

सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाला आमदार सरोज अहिरे ह्या आपल्या अडीच महिन्यांच्या बाळाला घेऊन मुंबईत आल्या आहेत. मात्र, विधीमंडळ परिसरातील हिरकणी कक्षाची दुरवस्था पाहून त्यांना अश्रू अनावर झाले. उद्यापर्यंत माझ्या बाळाची व्यवस्था नीट न झाल्यास आपण अधिवेशनाला उपस्थित राहू शकत नाही, असे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, माझ्या 5 महिन्यांच्या बाळाची तब्येत बरी नाही. याठिकाणी धुळीत मी माझ्या बाळाला कसे ठेवावे? मी मागणी केलेली असतानासुद्धा तुम्ही मला हिकरणी कक्षाची सुविधा देऊ शकत नाही. माझ्यासाठी नाही, पण माझ्या बाळासाठी तरी द्या, जेणेकरून तो सुरक्षित राहिल आणि मी मतदारसंघासाठी काम करू शकेन, अशा शब्दांत त्यांनी आपल्या वेदना मांडल्या.

अहिरे म्हणाल्या की, मी आठ दिवसापूर्वी प्रधान सचिवांकडे हिरकणी कक्ष उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यांनी एक कार्यालय रिकामे करून दिले. मात्र, त्या ठिकाणी फक्त खुर्च्या-टेबल आहेत. पलंग नाही, लहान बाळासाठीच्या सुविधा नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली.

दरम्यान, आता राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सरोज अहिरे यांच्याशी फोनवर संवाद साधला. यावेळी सावंत यांनी सांगितले की, ताई, उद्या तुमच्यासाठी हिरकणी कक्षाची व्यवस्था केलेली असेल. सोबत बाळाच्या देखभालीसाठी बाया, आणि डॉक्टरही उपस्थित असतील, असा विश्वास दिला. सावंत यांनी आज अहिरे यांची जी जी गैरसोय झाली, त्याबद्दल त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली.

त्याप्रमाणे आज विधापरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास जी दानवे यांच्या उपस्थितीत आया, नर्स, डॉक्टर, स्वच्छ बेड – पाळणा व इतर सुविधांनी सुसज्ज असा हिरकणी कक्ष सरोज ताई व त्यांच्या बाळाला उपलब्ध करून देण्यात आला. कक्षात केलेल्या व्यवस्थे बद्दल सरोजताई यांचे समाधान झाले व त्यांनी एवढ्या तत्परतेने तक्रारीची दखल घेत स्वतः जातीनिशी तक्रार निवारण केल्याबद्दल आरोग्यमंत्री मंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांचे आभार व्यक्त केले.आपल्या कुटुंबातील जबाबदाऱ्या पार पाडत कर्तव्यदक्ष असणाऱ्या महीला पोलिसांसाठी असे हिरकणी कक्ष येत्या काळात उभारण्याचा मानस आरोग्यमंत्री मंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी व्यक्त केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube