महाविकास आघाडीत फुट?; जयंत पाटलांनी चौकार मारत जाहीर केली कोकण पट्ट्यातील उमेदवारांची नावं
Jayant Patil : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली असून महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीमध्ये (Mahayuti) जागावाटपाबाबत चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. पुढील एक – दोन दिवसात जागावाटपाची घोषणा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तर दुसरीकडे महाविकास आघाडीला मोठा धक्का देत शेतकरी कामगार पक्षाचे (SKP) सरचिटणीस जयंत पाटील (Jayant Patil) यांनी चार उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये फुट पडणार का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. अलिबागमध्ये (Alibaug) आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी चार उमेदवारांची घोषणा केली आहे.
त्यांनी पेण सुधागड, उरण, पनवेल आणि अलिबाग या चार मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. पेण सुधागड विधानसभा मतदारसंघातून अतुल म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर उरणमधून प्रीतम म्हात्रे, पनवेलमधून माजी आमदार बाळाराम पाटील आणि अलिबाग मधून शेकापच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील निवडणूक लढवणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.
काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीसोबत लढवणार असल्याची माहिती दिली होती मात्र सध्या महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून सुरु असलेल्या वादामुळे त्यांनी चार उमेदवारांची घोषणा केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमधील घटक पक्ष समाजवादी पार्टीने (SP) देखील उमेदवारांच्या नावांची घोषणा केल्याने महाविकास आघाडीमध्ये फुट पडली असल्याची चर्चा सुरु आहे. सध्या महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबत चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
मोठी बातमी! विधानसभेच्या तोंडावर MIM मध्ये मोठी फूट, कार्याध्यक्ष गफार कादरींचा राजीनामा
विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात राज्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी मत मोजणी होणार आहे. लोकसभेप्रमाणे यावेळी देखील महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मुख्य लढत पाहायला मिळत आहे. आतापर्यंत भाजपकडून 99 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेनेकडून (ठाकरे गट) एबी फॉम वाटप करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.