राज्याचा विकास जयंत पाटील योग्य करु शकतात; फडणवीसांच्या चॅलेंजनंतर पवारांचं सूचक विधान

राज्याचा विकास जयंत पाटील योग्य करु शकतात; फडणवीसांच्या चॅलेंजनंतर पवारांचं सूचक विधान

Sharad Pawar on Jayant Patil : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आव्हान प्रतिआव्हानांची भाषा सुरू झाली आहे. काल महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद होती. या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट शरद पवारांना आव्हान दिले होते. आधी महाविकास आघाडीने त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा असे विधान फडणवीस यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेलं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांना उत्तर म्हणून पाहिलं जात आहे.

काय म्हणाले शरद पवार ?

पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. राज्याचा विकास आणि राज्याचा राजकीय दृष्ट्‍या प्रगती करण्यासाठी जयंत पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. आज राज्याचा कारभार चुकीच्या हातांत आहे. त्याचा फटका राज्याला बसत आहे. महायुतीमुळे राज्याची प्रतिमा मलीन झाली असून यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. राज्याचा विकास जयंत पाटील योग्य पद्धतीने करू शकतात याची मला खात्री आहे, असा विश्वास शरद पवार यांनी (Sharad Pawar) शिवस्वराज्य यात्रेच्या समारोपप्रसंगी व्यक्त केला.

बाळासाहेब आजबेंना निवडणूक जड जाणार? शरद पवारांचे विश्वासू राम खाडे मैदानात उतरणार

शरद पवार यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. जयंत पाटील महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार का असा प्रश्न विचारला जात आहे.

काय म्हणाले होते फडणवीस?

मंगळवारी संयुक्त पत्रकार परिषदेत महायुती सरकारचं रिपोर्ट कार्ड सादर करण्यात आलं होतं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी थेट शरद पवारांनाच आव्हान दिलं होतं. सत्ता पक्षाला कुठलीही चिंता नाही. मुख्यमंत्री स्वतःच येथे आमच्याबरोबर बसले आहेत. त्यांना विचारा तुमचा चेहरा कोण. माझं शरद पवारांना खुलं आव्हान आहे तुमचा मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण ते सांगा?

जयत पाटलांनीही दिली प्रतिक्रिया

शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर जयंत पाटील म्हणाले, माझ्यावर मोठी जबाबदारी आहेच. जास्तीत जास्त विधानसभेला जागा निवडून आणायच्या आहेत. त्यासाठी आम्ही सगळेच प्रयत्न करत आहोत. बाहेरील लोकांना आमच्या पक्षात घेण्याचा काहीच प्रश्न येत नाही. आमच्याकडे तरुण चेहरे आहेत. मुख्यमंत्रि‍पदाचा उमेदवार जाहीर करावा असा उद्धव ठाकरे यांचा आग्रह आहे. याबाबत आमच्यात चर्चा सुरू आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीपेक्षा मविआत यावं, जयंत पाटील यांची खुली ऑफर 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube