Salman Khan House Firing : पनवेलमध्ये मुक्काम अन् वांद्र्यात रेकी; गोळीबार प्रकरणात धक्कादायक खुलासा
Salman Khan House Gun Firing Case : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबाराची घटना (Salman Khan House Firing) शनिवारी घडली. गोळीबार करून आरोपी फरार झाले. मात्र पोलिसांनी प्रयत्नांची शिकस्त करत अवघ्या 48 तासांच्या आत दोघांच्या मुसक्या आवळल्या. यासाठी त्यांनी थेट गुजरातमधील भूज गाठलं. कारण दोघे तेथे लपून बसले होते. या प्रकरणात आणखीही काही संशयितांना आधीच ताब्यात घेतले गेले. हे झालं आतापर्यंतचं वास्तव. मात्र, या गोळीबाराचं प्लॅनिंग काही एका दिवसात झालेलं नाही. यासाठीही मोठी तयारी करण्यात आली होती, याचा खुलासा आता झाला आहे.
सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी आणि पनवेलच्या फार्म हाऊसची शूटरने एका महिन्यापूर्वीच रेकी केली होती, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. पोलिसांनी काल तिघा संशयितांना ताब्यात घेतले होते. त्यांची चौकशी सुरू असून अद्याप सविस्तर माहिती हाती आलेली नाही. मात्र या गोळीबारात वापरण्यात आलेली दुचाकी आणि पनवेलमध्ये ज्या ठिकाणी हे लोक राहत होते त्या फ्लॅटमालकाचा मागमूस पोलिसांना मिळाला आहे.
Salman Khan Threat: सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून सुरक्षेत वाढ
रविवारी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी सलमान खानच्या घराबाहेर अंदाधुंद गोळीबार केला होता. हवेत चार ते पाच गोळ्या फायर केल्या होत्या. यानंतर दोघांनी रिक्षाचालकाला वसईकडे जाणारा रस्ता कोणता याची चौकशी केली होती. पुढे एक किलोमीटर गेल्यानंतर त्यांनी दुचाकी तेथेच सोडून दिली होती.
रिक्षाच्या मदतीने वांद्रे रेल्वे स्थानकात आल्यानंतर पुढे सांताक्रूझ येथे उतरले होते. सांताक्रूझ वाकोला ते नवी मुंबई प्रवास त्यांनी रिक्षातून केला होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये या गोष्टी कैद झाल्या आहेत. पोलिसांनी त्याआधारे तपासाला गती दिली.
या गुन्ह्यात जी दुचाकी वापरण्यात आली ती दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. ही दुचाकी पनवेल येथे राहणाऱ्या एका व्यक्तीची असल्याचे समजते. ही दुचाकी त्याने या लोकांना विकल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. याच चौकशीतून पुढे असे समजले की शार्प शूटर मागील एक महिन्यापासून पनवेलमध्ये राहत होते. येथे त्यांनी एक घर भाड्याने घेतले होते.
Salman Khan च्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणी तीन जण ताब्यात; तपास क्राईम ब्रॅंच करणार
कुणालाही संशय येऊ नये यासाठी ते नोकरीसह अन्य कामानिमित्त पनवेल येथे राहत असल्याचे सांगत होते. याच दरम्यान त्यांनी पनवेल येथील सलमान खानच्या फार्म हाऊसची रेकी केली होती. तसेच गोळीबारानंतर अनमोल बिश्नोई या फेसबूक अकाउंटवरून सलमान खानला इशारा देणारी एक पोस्ट अपलोड करण्यात आली होती. पोलिसांनी या पोस्टची सत्यता पडताळून पाहिली. त्यावेळी ही पोस्ट पोर्तुगालच्या आयपी अॅड्रेसवरून अपलोड झाल्याची माहिती समोर आली.