मोठी बातमी! बच्चू कडूंना महायुती अन् मविआचाही फोन; नेमकं काय घडतंय?
Bacchu Kadu : राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. मात्र त्याआधीच महायुती आणि महाविकास आघाडीने विजयाचे दावे केले आहेत. काही एक्झिट पोल्समध्ये या निवडणुकीत अपक्ष आणि बंडखोर उमेदवार निर्णायक भूमिकेत असतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या अपक्ष आणि बंडखोरांशी संपर्क साधण्यात येत आहे. या घडामोडी घडत असतानाच मोठी बातमी समोर आली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांना महायुती आणि महाविकास आघाडीकडून संपर्क साधण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या निकालानंतर बच्चू कडू नेमकी (Bacchu Kadu) काय भूमिका घेतात याची उत्सुकता आहे.
या निवडणुकीत बच्चू कडू यांनी वेगळी भूमिका परिवर्तन महाशक्तीच्या रुपाने तिसरी आघाडी उभी केली होती. या आघाडीला राज्यात 15 जागा मिळतील असा दावा बच्चू कडू यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे बच्चू कडू यांनी पाठिंबा द्यावा यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे.
राज्यात आमच्या पक्षाचे दहा आमदार निवडून येतील. तर परिवर्तन महाशक्तीचे 15 आमदार निवडून येतील. कोणत्याही आघाडीची सत्ता येईल अशी आकडेवारी जुळत नाही. त्यामुळे आम्ही सत्ता स्थापन करणार आहोत. बाकीच्यांना आम्हाला पाठिंबा द्यावा लागेल असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे.
प्रकाश आंबेडकरांची भूमिक काय?
जर उद्या वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला किंवा युतीला पाठिंबा देण्यासाठी संख्याबळ मिळाले, तर आम्ही सरकार स्थापन करू शकणाऱ्याच्या सोबत राहणे पसंद करणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत म्हटले आहे.
यावेळी विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीत चुरशीची स्पर्धा पाहायला मिळते. यावेळी अनेक छोटे पक्ष आणि बंडखोर देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आता हे घटक कोणाला पाठिंबा देणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. वंचित बहुजन आघाडीची ताकद मुंबई, नाशिक आणि मराठवाडा या भागात दिसून येते. आपला पक्ष राज्यातील सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा आवाज बनेल, असा दावा या पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलेला आहे.
महायुतीचा प्लॅन बी रेडी! शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान, म्हणाले, गरज पडली तर..