Maharashtra : तीन दिवसानंतरही मुख्यमंत्री ठरेना? आता भाजप राज्यात निरीक्षक पाठविणार
Maharashtra Government Formation: राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. 236 जागा मिळूनही महायुतीमध्ये मुख्यमंत्री ठरविण्याबाबतचा निर्णय झालेला नाही. 132 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे. त्यामुळे भाजपचाच (BJP) मुख्यमंत्री होईल, अशी राजकीय चर्चा आहे. परंतु विधानसभेचा निकाल लागून तीन दिवस झालेले आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. ते आता काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत. मुख्यमंत्री ठरविण्याबाबत दिल्लीमध्ये भाजपच्या बैठका सुरू आहेत. त्यात आता भाजपकडून राज्यात निरीक्षक पाठविला जाणार आहे. निरीक्षक आमदारांची चर्चा करून त्यांचे मत जाणून घेऊन मुख्यमंत्री कुणाला करायचे यावर निर्णय घेणार आहे.
23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. त्यात भाजपचे सर्वाधिक 132 आमदार निवडून आले आहेत. तर एकनाथ शिंदे यांचे 57 आमदार, तर अजित पवार यांचे 41 आमदार निवडून आले आहेत. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही तिन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्रीपदावर कोण बसेल यावर अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही. त्यात आता विधानसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. ते आता नवीन सरकार स्थापन होऊपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री असणार आहे. तर नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित झालेले नाही. त्यामुळे नवे सरकार कधी स्थापन होईल हे अद्याप निश्चित झालेले नाही. परंतु काही माध्यमांनी आणखी तीन ते चार दिवसांनी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल.
देवेंद्र फडणवीसांचे नावावर शिक्कामोर्तब ?
भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचे नाव शर्यतीत आहे. फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत, असे जाहीरपणे भाजपचे आमदार सांगत आहेत. पण दिल्लीच्या नेतृत्वाने फडणवीस यांच्या नावाला हिरवा कंदिल दाखविला असल्याचे वृत्त आहे. परंतु भाजपकडून अद्याप निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. त्यात आता भाजपकडून पक्ष निरीक्षक राज्यात पाठविण्यात येणार आहे. हा पक्ष निरीक्षक आमदारांची मते जाणून घेईल. त्यानंतर निर्णय जाहीर करतील.
अजित पवारांची फडणविसांची पसंती पण
राष्ट्रवादी काँग्रेसकडून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्याबाबत पसंती दर्शविली आहे. भाजपचा मुख्यमंत्री होण्यास राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे. तर तिकडे शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांनाच दुसऱ्यांदा मुख्यमंत्री करण्याबाबत दबाव टाकला जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाल्याने महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. त्यामुळे त्यांनाच मुख्यमंत्री करावे. बिहारमध्ये नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केले आहे. तोच पॅटर्न महाराष्ट्रात लागू करावे, असे आता शिंदे सेनेचे आमदार म्हणू लागले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय झालेला नाही.