महायुतीच्या नेत्यांची दिल्लीत मध्यरात्री खलबतं, जागावाटपाचा तिढा सुटला?

महायुतीच्या नेत्यांची दिल्लीत मध्यरात्री खलबतं, जागावाटपाचा तिढा सुटला?

Maharashtra Assembly Elections 2024 : राज्यात आता महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप (Maharashtra Assembly Elections 2024) अंतिम टप्प्यात आले आहे. दोन्ही आघाड्यांच्या नेत्यांकडून तसा दावा केला जात आहे. महायुतीच्या जागावाटपाची चर्चा वेगाने पुढे सरकत आहे. काल मध्यरात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्यातील महायुतीच्या नेत्यांची महत्वाची बैठक दिल्लीत पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या बैठकीत जागावाटपावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. जवळपास सर्वच जागांचा तिढा सुटला आहे. अजूनही काही जागांवर तिढा कायम आहे अशी माहिती मिळाली आहे.

महायुतीत लहान पक्षांचा टिकाव लागणं अवघड, वापरा, फोडा अन्.. जानकरांची सडकून टीका

महाविकास आघाडीप्रमाणेच महायुतीतही काही जागांवर तिढा आहे. या जागांचा तिढा या बैठकीतही सुटला नसल्याची माहिती आहे. या जागांवर राज्यातील नेत्यांनी एकत्रित बसून चर्चा करून काय तो निर्णय घ्यावा अशा सूचना अमित शाहांना दिल्याचे समजते. या जागा कोणत्या आहेत याची माहिती मात्र अजूनही मिळू शकलेली नाही. निवडणुकीतील प्रचाराचे मुद्दे, जाहीरनामा या महत्वाच्या गोष्टींवरही बैठकीत चर्चा झाली.

राज्यात आगामी निवडणुका महायुती (Mahayuti Seat Sharing) एकत्रित लढणार असल्याचे नेते सांगत आहेत. त्यानुसार वरिष्ठ पातळीवर घडामोडी घडताना दिसत आहे. जमिनीवर मात्र तशी परिस्थिती दिसत नाही. अजित पवार महायुतीत आल्याने अनेक इच्छुकांची अडचण झाली आहे. त्यामुळे अनेक दिग्गजांनी महाविकास आघाडीची वाट धरली आहे. त्यातही शरद पवार गटाकडे इच्छुकांचा ओढा वाढला आहे. स्थानिक पातळीवरही बंडखोरीची भाषा वाढू लागली आहे. भाजपाच्या नेत्यांना अजित पवार गटावर नाराजी व्यक्त करत  स्वतंत्र निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. याचा प्रत्यय काल जुन्नरमध्येही दिसला.

आता या इच्छुकांची मनधरणी कशी करायची हा मोठा प्रश्न नेत्यांसमोर निर्माण झाला आहे. तर स्थानिक पातळीवर भाजप कार्यकर्त्यांत नाराजी दिसून येत आहे. ज्या राष्ट्रवादी काँग्रेसशी आयुष्यभर लढलो त्याच राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार करायचा कसा असा प्रश्न स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळेच राज्यात अनेक मतदारसंघात खदखद बाहेर पडताना दिसत आहे. आता या परिस्थितीवर महायुतीचे नेते कसा मार्ग काढतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मावळातील भाजप नेत्यांना फडणवीस मुख्यमंत्री नको? स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा सवाल..

follow us
  • fb
  • instagram
  • youtube