‘एक तुतारी द्या मज आणुनि, विकासासाठी अन् विजयासाठी…’, बापूसाहेब पठारेंनी फोडला प्रचाराचा नारळ
Pune Vadgaon Sheri Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शेवटचा दिवस आहे. दरम्यान, आता बहुतेक राजकीय पक्षांकडून आणि नेत्यांकडून प्रचारफेरी आणि पदयात्रेच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधला जातोय. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे (Bapusaheb Pathare) यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली. बापूसाहेब पठारे यांच्या पदयात्रेचा शुभारंभ बलिप्रतिपदेच्या पवित्र मुहूर्तावर नवी खडकी येथील श्री काळभैरवनाथ मंदिरात झाला.
वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी सोमवारी प्रचाराला सुरूवात केली. पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, युवा, महिला यांच्या साक्षीने त्यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेला हा जनसमुदाय आगामी २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विजयाचा जणू विश्वास देत होता. पदयात्रेचा प्रारंभ श्री भैरवनाथांचे मनोभावे दर्शन घेऊन झाला आणि चांगभलंच्या घोषणा दिल्या गेल्या. या निमित्ताने बापूसाहेब पठारे यांनी नागरिकांशी संवाद साधला. येत्या निवडणुकीत ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्याला बहुमताने विजय मिळवून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, माता भगिनी, आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी औक्षणाने आणि पाठिंब्याने त्यांना समर्थन मिळाले. ‘प्रचाराचा शुभारंभ ही विजयाची नांदी आहे. सर्वांचा पाठिंबा मिळाल्याने या पदयात्रेतून मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने टाकले गेले आहे. हे पाऊल एक नवा संदेश देणारे ठरले आहे. एकत्र येऊन, सहकार्याने विकासाचे ध्येय गाठण्याचा निर्धार आपण केला आहे,’ असे उद्गार यावेळी बापूसाहेब पठारे यांनी काढले.
दरम्यान, पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून आजी-माजी आमदार इच्छुक होते. अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार सुनील टिंगरे यांना वगळून आपल्याला उमेदवारी मिळेल, असा दावा भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी केला होता. मात्र, महायुतीकडून पुन्हा सुनील टिंगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळं या मतदारसंघात बापूसाहेब पठारे विरुद्ध सुनील टिंगरे यांच्यात लढत होणार आहे.