10 वर्षांपूर्वीच्या मदतीची PM मोदींनी ठेवली आठवण : अमेरिकेतील मित्राला राम मंदिर सोहळ्याचे ‘खास’ निमंत्रण
अयोध्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी तब्बल 10 वर्षांपूर्वी केलेल्या एका मदतीची आठवण ठेवत आपल्या जुन्या मित्राला श्रीराम मंदिराच्या उद्घाटन आणि रामलल्लाच्या मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे निमंत्रण पाठविले आहे. डॉ. भरत बरई (Bharat Barai) असे या मित्राचे नाव आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी यांच्यासाठी व्हिसा क्लिअरन्स मिळवून देण्यासाठी डॉ. बरई यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.
डॉ. बरई यांच्यासोबतच इंडियाना येथील नोकिया बेल लॅब्सचे वरिष्ठ सहकारी, नॉर्वेजियन खासदार, न्यूझीलंडचे शास्त्रज्ञ, फिजीयन उद्योगपती आणि कॅरिबियनमध्ये हिंदू शाळा स्थापन करणारे संत अशा तब्बल 53 देशांतील खास 100 आंतरराष्ट्रीय पाहुण्यांनाही राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण पाठविण्यात आले आहे. (Dr. Bharat Barai, who helped Narendra Modi get visa clearance during the 2014 Lok Sabha elections, was given a special invitation to the Ram Mandir function.)
कोण आहेत डॉ. भारत बरई?
डॉ. भरत बरई हे ख्यातनाम कर्करोग तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. ते सध्या अमेरिकेतील हिंदू युनिव्हर्सिटीत कॅन्सर इन्स्टिट्यूट मेथडिस्ट हॉस्पिटल आणि क्लिनिकल असिस्टंटचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय त्यांनी इंडियाना युनिव्हर्सिटी मेडिकल स्कूलमध्ये प्राध्यापक, इंडियाना राज्याच्या मेडिकल लाईसेंसिंग बोर्डाचे सचिव आणि माजी अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.
पंतप्रधान मोदीना पुन्हा व्हिसा मिळवून देण्यासाठी बजावली होती महत्वाची भूमिका :
डॉ. बरई यांचे आणि पंतप्रधान मोदी यांचेही जुने मैत्रीचे संबंध आहेत. शिवाय अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात चांगले वजन आहे. 2002 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री असताना झालेल्या गोध्रा दंगल आणि हत्याकांडानंतर अमेरिकेने त्यांच्यावर 10 वर्षांच्या व्हिसाची बंदी घातली होती. हीच बंदी मागे घेऊन व्हिसा क्लिअर करण्यासाठी डॉ.बरई यांनी अमेरिका सरकारकडे शब्द टाकला होता.
भाजपकडून जय्यत तयारी :
येत्या 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी भाजप आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनांकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. देशातील विविध ठिकाणी राम मंदिर सोहळ्याचा ऐतिहासिक क्षण दिवाळी सणासारखाच साजरा करण्यात यावा, असे आवाहन भाजप नेत्यांकडून करण्यात आले आहे. त्यामुळे देशभरात येत्या 22 जानेवाारीला दिवे लावून हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहेत.