मराठी सिनेमाचा केंद्रबिंदू बदलतोय…

Marathi cinema साठी २०२५ हे वर्ष केवळ यशाचं नाही, तर दिशादर्शक ठरलं नव्या दिग्दर्शकांची दृष्टी, आत्मविश्वास, निर्भीडता हे मोठं भांडवल बनलं.

  • Written By: Published:
Marathi Cinema

अमित भंडारी, डिजीटल सीईओ सोहम ग्रुप

२०२५ : मराठी सिनेमासाठी नव्या दिग्दर्शकांचं निर्णायक वळण

२०२५ हे वर्ष मराठी सिनेमासाठी केवळ यशाचं नाही, तर खऱ्या अर्थानं दिशादर्शक ठरलेलं आहे. नव्या दिग्दर्शकांनी दाखवलेली दृष्टी, आत्मविश्वास आणि निर्भीडता हेच या टप्प्यावर मराठी सिनेमाचं सर्वात मोठं भांडवल बनलं आहे. या वर्षाच्या यशाचा लेखाजोखा मांडताना एक गोष्ट प्रकर्षानं जाणवतेमराठी सिनेमाचा केंद्रबिंदू बदलतोय.

मराठी सिनेमा गेली अनेक वर्षे स्वतःची ओळख शोधत आहे. साहित्य, नाटक आणि लोककलेच्या समृद्ध परंपरेचा वारसा घेऊन जन्माला आलेला हा सिनेमा स्वतंत्र माध्यम म्हणून स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी सातत्यानं झगडत राहिला. आशय आणि विषयांच्या बाबतीत तो कायमच सकस राहिला; मात्र चित्रभाषा, तांत्रिक मांडणी, वित्तीय गणितं आणि बाजारपेठेच्या दबावाशी जुळवून घेताना अनेक अडथळे आले.

या चाचपडण्याच्या प्रवासात मराठी चित्रपट खऱ्या अर्थानं तरला तो लिखाण आणि अभिनयाच्या बळावर. पण चित्रपट हे शेवटी दिग्दर्शकाचं माध्यम आहेआणि म्हणूनच २०२५ हे वर्ष विशेष ठरतं. कारण याच वर्षी मराठी सिनेमाला असे दिग्दर्शक लाभले, जे निर्भीड आहेत, नवी भाषा बोलतात आणि जागतिक पातळीवर मराठी सिनेमाची ओळख ठामपणे निर्माण करू पाहतात.

नवा दिग्दर्शकीय आत्मविश्वास, नवी चित्रभाषा

या वर्षाची खरी गंमत इतकीच नाही की काही चांगले चित्रपट आले; तर ही आहे की हे चित्रपट भारत आणि जगाच्या पातळीवर मराठी सिनेमाचं स्थान निश्चित करणारे ठरले.

साबर बोंड | दिग्दर्शक : रोहन कनवडे साबर बोंड हा केवळ कथानकप्रधान चित्रपट नाही, तर तो माणसाच्या अंतर्मनातील संघर्ष, सामाजिक वास्तव आणि नातेसंबंध यांचा अत्यंत सूक्ष्म अभ्यास आहे. मोजक्या संवादांतून आणि प्रभावी दृश्यरचनेतून कथा उलगडत जाते. विषयाची समकालीनता आणि त्यावर केलेलं संवेदनशील भाष्य यामुळे हा चित्रपट जागतिक सिनेमाच्या पटलावर मराठी सिनेमाची पाऊलखूण उमटवतो. मराठी सिनेमाच्या इतिहासात नोंद घ्यावी असा हा अनुभव ठरतो.

तीन पायांचा घोडा | दिग्दर्शक : नूपूर बोरा मर्यादित साधनसंपत्ती असूनही सिनेमा किती ताकदीनं उभा राहू शकतो, याचं जिवंत उदाहरण म्हणजे तीन पायांचा घोडा. अपूर्णतेतून उगवणारी आशा, संघर्षातला ध्यास आणि कलात्मक प्रामाणिकपणाया त्रिसूत्रीतून हा सिनेमा आकार घेतो. धाडस आणि दिग्दर्शकीय ठामपणा असेल, तर प्रयोगशील सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतो, हे हा चित्रपट ठामपणे सांगतो.

स्वतंत्र निर्मितीचा नवा आत्मसन्मान

कुर्ला ते वेंगुर्ला | दिग्दर्शक : विजय कलमकर हा सिनेमा एका प्रवासाची गोष्ट सांगतोपण तो प्रवास केवळ भौगोलिक नाही. तो माणसाच्या आतल्या बदलांचा, नात्यांचा आणि सामाजिक वास्तवाचा आहे. कुर्ला ते वेंगुर्ला स्वतंत्र सिनेमाची खरी ताकद काय असते, हे दाखवतो. साध्या गोष्टीतून मोठा आशय मांडण्याची दिग्दर्शकीय समज या चित्रपटाला वेगळं स्थान देते.

आठवणींशी संवाद…

एप्रिल मे ९९ | दिग्दर्शक : रोहन मापुसकर हा सिनेमा म्हणजे थेट बालपणात परत नेणारी एक भावनिक सफर. लहानसहान आठवणी, त्या काळातील निरागसता आणि काळाच्या ओघात हरवलेले क्षणएप्रिल मे ९९ प्रेक्षकांच्या मनात आठवणींची शिदोरी उघडतो. हा सिनेमा पाहिल्यानंतर बराच काळ मनात रेंगाळत राहतो.

स्थळ | दिग्दर्शक : जयंत दिगंबर सोमलकर स्थळ हा मराठी सिनेमानं जगाला दिलेला अत्यंत महत्त्वाचा चित्रपट आहे. ग्रामीण-सामाजिक वास्तव अत्यंत प्रामाणिकपणे मांडत, तो माणसाच्या जगण्यातील मूलभूत प्रश्नांना हात घालतो. साधेपणा, आशयाची खोली आणि वास्तववादी चित्रभाषा यामुळे हा सिनेमा जागतिक पातळीवरही मराठी सिनेमाचं समर्थ प्रतिनिधित्व करतो.

गोंधळ | दिग्दर्शक : संतोष डावखर गोंधळ हा अंतर्मुख करणारा, अस्वस्थ करणारा पण आवश्यक असा अनुभव आहे. सामाजिक, मानसिक आणि भावनिक स्तरांवर प्रश्न उपस्थित करत हा चित्रपट प्रेक्षकाला विचार करायला भाग पाडतो. मनोरंजनापलीकडे जाऊन सिनेमा समाजाशी संवाद कसा साधू शकतो, याचं हे उदाहरण आहे.

OTT, Youth आणि नव्या शक्यता

आरपार | दिग्दर्शक : गौरव पत्की आरपार हा केवळ youth anthem नाही, तर प्रेमकथेला नवं परिमाण देणारा सिनेमा आहे. तरुणाईच्या भावना, निर्णय आणि संघर्ष आधुनिक भाषेत मांडणारा हा चित्रपट OTT पिढीशी थेट संवाद साधतो.

आता थांबायचा नाय | दिग्दर्शक : शिवराज वायचळ हा सिनेमा आशेचा, जिद्दीचा आणि पुढे जाण्याच्या वृत्तीचा आहे. नवोदित निर्मात्यांसाठीच नाही, तर समाजासाठीही हा चित्रपट एक सकारात्मक संदेश देतोकी परिस्थिती कितीही अवघड असली, तरी थांबायचं नाही.

तंत्रज्ञान आणि मानवी संवेदनशीलतेचा मिलाफ

उत्तर | दिग्दर्शक : क्षितिज पटवर्धन AI, तंत्रज्ञान आणि वेगवान जगाच्या पार्श्वभूमीवर मानवी भावना कशा जपता येतात, याचं प्रांजळ भाष्य उत्तर करतो. आधुनिक विषय हाताळत असतानाही हा सिनेमा मानवी संवेदनशीलतेचा धागा घट्ट पकडून ठेवतो.

दशावतार | दिग्दर्शक : सुबोध खानोलकर दशावतारनं आशयाच्या पातळीवरच नाही, तर बॉक्स ऑफिसवरही आपली ताकद सिद्ध केली. नव्या दिग्दर्शकांमध्ये आणि नव्या निर्मिती टीममध्ये असलेली धमक हा सिनेमा ठळकपणे दाखवतोआणि प्रेक्षक समकालीन विचार व नव्या प्रयोगांना स्वीकारण्यासाठी तयार आहेत, याची ठोस पावती देतो.

२०२५ सालातील हे चित्रपट एक गोष्ट स्पष्ट सांगतातमराठी सिनेमा आता केवळ टिकून राहण्यासाठी नाही, तर ठामपणे पुढे जाण्यासाठी सज्ज आहे. नवे दिग्दर्शक, नवी भाषा आणि नवे प्रयोग यांच्यामुळे मराठी सिनेमा आता आशयघनतेच्या आणि सादरीकरणाच्यादृष्टीने नव्या उंचीच्या दिशेने वाटचाल करतोय…

follow us