विमल जाहिरात प्रकरणी अजय देवगणची हायकोर्टात धाव; तुकाराम मुंढेंनी दिली महत्त्वाची माहिती

Ajay Devgn Vimal Advertisement Case : विमल इलायचीच्या जाहिरातीवरून सुरू झालेला वाद आता न्यायालयात पोहोचला आहे.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 10 31T173854.670

Ajay Devgn Vimal Advertisement Case : विमल इलायचीच्या जाहिरातीवरून सुरू (FDA) झालेल्या वादात अभिनेता अजय देवगणने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) बजावलेल्या कारणे दाखवा नोटिशीला त्याने न्यायालयात आव्हान दिलं आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी 30 ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. देवगणने न्यायालयात धाव घेतली असली, तरी विभागाची कारवाई नियमानुसार सुरूच राहणार असल्याचं मुंढे यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणाची सुनावणी 4 नोव्हेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात होण्याची शक्यता आहे.

विमल इलायचीच्या जाहिरातींमधून बंदी असलेल्या विमल पानमसाल्याची अप्रत्यक्ष जाहिरात केली जात असल्याचा FDA चा आक्षेप आहे. याच प्रकरणात 11 ऑगस्ट 2026 रोजी विभागाने अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या. या जाहिरातींमधील ब्रँडची ओळख, संवाद आणि सादरीकरणाची पद्धत यामुळे ग्राहकांच्या मनात पानमसाल्याच्या उत्पादनाची प्रतिमा निर्माण होऊ शकते, असा विभागाचा दावा आहे. त्यामुळे जाहिरातींशी असलेला संबंध स्पष्ट करण्याबरोबरच प्रचार साहित्य हटवण्यास आणि जाहिरात करारासह संबंधित कागदपत्रांची माहिती देण्यासही कलाकारांना सांगण्यात आलं होतं.

वर्षभर मुंबई पोलिसांना जमलं नाही, तुकाराम मुंढेंनी आठवड्यात करून दाखवलं, कॅन्टीनला 75 हजारांचा दंड!

अजय देवगणने दाखल केलेल्या याचिकेत आपल्याला अभिनेता म्हणून नोटीस बजावणं मनमानी असल्याचा युक्तिवाद केल्याचं वृत्त आहे. संबंधित जाहिरातींच्या निर्मितीशी किंवा उत्पादनाशी संबंधित कंपनीऐवजी कलाकाराला जबाबदार धरण्याच्या FDA च्या भूमिकेला त्याने आव्हान दिलं आहे. दरम्यान, शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ या तिघांनीही नोटिसांना उत्तर दिलं होतं. सुनावणीसाठी अतिरिक्त वेळ मागितल्यानंतर विभागाने त्यांना संधी दिली. सहाय्यक आयुक्त स्तरावरील सुनावणी पूर्ण झाली असून, प्रकरण आता पुढील निर्णयासाठी संयुक्त आयुक्तांकडे पाठवण्यात येणार आहे.

या प्रकरणात कलाकारांनी न्यायालयात धाव घेतली असली, तरी त्याचा विभागाच्या प्रक्रियेवर परिणाम होणार नसल्याचं मुंढे यांनी सांगितलं. FSSAI च्या जाहिरात आणि दावेविषयक नियमांनुसार अन्नपदार्थांबाबत खोटे, दिशाभूल करणारे किंवा पुराव्याशिवाय दावे करता येत नाहीत. जाहिरातदारांबरोबरच जाहिरातीत सहभागी असलेल्या सेलिब्रिटींचीही जबाबदारी निश्चित केली जाऊ शकते, अशी FDA ची भूमिका आहे. लोकप्रियता, प्रसिद्धी किंवा सेलिब्रिटीचा दर्जा कोणालाही कायद्यापेक्षा मोठं ठरवत नाही, असं स्पष्ट करत मुंढे यांनी नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे

follow us