‘गांधी’ मालिकेचा वर्ल्ड प्रीमियर TIFF 2025 मध्ये! पहिली भारतीय मालिका म्हणून ऐतिहासिक बहुमान

Gandhi Series World Premiere In TIFF 2025 : भारतीय कथांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. अप्लॉज़ एंटरटेनमेंटची बहुप्रतीक्षित आंतरराष्ट्रीय मालिका ‘गांधी’ (Gandhi) यावर्षीच्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (TIFF) 2025 मध्ये वर्ल्ड प्रीमियर करणार आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या दिग्दर्शनात आणि अभिनेते प्रतीक गांधी यांच्या मुख्य भूमिकेत साकारलेली ही मालिका TIFF च्या ‘प्राइमटाइम प्रोग्रॅम’मध्ये निवडली गेली असून, या प्रतिष्ठित महोत्सवात दाखवली जाणारी ही पहिली भारतीय मालिका (Entertainment News) ठरली आहे.
इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्या प्रामाणिक पुस्तकांवर आधारित ‘गांधी’ ही एक भव्य आणि बहु-हंगामी कथा आहे. ही मालिका मोहनदास करमचंद गांधी यांच्या जीवनाकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून पाहते – फक्त आपण ओळखतो त्या ‘महात्म्या’च्या रूपात नाही, तर एक तरुण, मानवी कमतरता असलेला आणि महत्त्वाकांक्षी व्यक्ती म्हणून, जो आजवर जगासमोर आला नाही.
पहिल्या हंगामाचे शीर्षक ‘An Untold Story of Becoming (1888–1915)’ असे असून, यात गांधीजींच्या सुरुवातीच्या प्रवासाचे चित्रण आहे – वसाहतवादी भारतातील एक जिज्ञासू किशोर, लंडनमधील लाजाळू लॉ स्टुडंट आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेत तब्बल 23 वर्षे वकील म्हणून काम करणाऱ्या तरुणाची कथा. ही कथा विरोधाभास, अपयश आणि आत्मशोधाने भरलेली आहे. महात्मा होण्याआधी, ते फक्त ‘मोहन’ होते.
2015 मध्ये सुरू झालेल्या TIFF च्या प्राइमटाइम प्रोग्रॅममध्ये नेहमी अशा मालिकांचा समावेश केला जातो ज्यांनी कथाकथनाच्या पद्धतीत नवे मार्ग उघडले आहेत. अल्फॉन्सो क्वारोनची ‘Disclaimer’ आणि नेटफ्लिक्सची ‘Dark’ यांसारख्या मोठ्या मालिका या यादीत राहिल्या आहेत. आता ‘गांधी’ या लिस्टमध्ये समाविष्ट होणे हा एक मोठा सांस्कृतिक टप्पा मानला जात आहे. अप्लॉज़ एंटरटेनमेंटचे मॅनेजिंग डायरेक्टर समीर नायर म्हणाले, “गांधी”चा TIFF मध्ये निवड होणे ही आमच्यासाठीच नव्हे, तर भारतीय कथांसाठी अभिमानाची बाब आहे. ही मालिका सखोल संशोधन आणि मानवी कथेबद्दलच्या अढळ विश्वासाचा परिणाम आहे, जी आम्ही जगाला सांगू इच्छित होतो.
दिल्ली बैठकीत ठाकरे ‘शेवटच्या रांगेत’! विरोधकांचा हल्लाबोल, थेट लाजच काढली…
दिग्दर्शक आणि शो-रनर हंसल मेहता यांनी सांगितले की, ‘गांधी’ ही त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात सर्जनशील आणि हृदयाला भिडणारी सफर आहे. ही फक्त भूतकाळाची गोष्ट नसून, मानवी विवेकावर एक विचार आहे. TIFF च्या 50व्या वर्षी माझ्या सर्वात मोठ्या प्रोजेक्टचा प्रीमियर येथे होणे माझ्यासाठी विशेष आहे.
TIFF मधील वर्ल्ड प्रीमियरला समीर नायर, हंसल मेहता, सिद्धार्थ खेतान, प्रतीक गांधी, टॉम फेल्टन आणि कबीर बेदी यांसारखे टीमचे महत्त्वाचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. या प्रकल्पाला संगीत ए. आर. रहमान यांनी दिले आहे. लेखन वैभव विशाल, करण व्यास, फेलिक्स वॉन स्टम, हेमा गोपीनाथन, सहज कौर मैनी आणि यशना मल्होत्रा यांनी केले आहे. पटकथा सल्लागार म्हणून सिद्धार्थ बसु आणि इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी योगदान दिले आहे. कास्टिंग मुकेश छाबडा आणि शकीरा डाउलिंग यांनी केले असून, प्रॉडक्शन डिझाईन शशांक तेरे, वेशभूषा डिझाईन पिया बेनेगल आणि छायाचित्रण प्रथम मेहता यांचे आहे.