‘सखाराम बाइंडर’ चे कलाकार पूरग्रस्तांच्या डोळ्यातील अश्रू पुसणार, सयाजी शिंदेंकडून दहा प्रयोगाचे मानधन
Sakharam Binder: दिल्लीतील प्रयोगातून जमा होणारे सर्व उत्पन्न पूरग्रस्त लोकांना मदत म्हणून दिले जाणार असल्याचे जाहीर

Sakharam Binder:नाटक म्हणजे समाजाचे प्रतिबिंब. ही सामाजिक बांधिलकी जपत, आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज आणि सुमुख चित्र यांनी ‘सखाराम बाइंडर’ (Sakharam Binder) या गाजलेल्या नाटकाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदतीचा एक मोठा हात दिला आहे. सुमुख चित्र निर्मित या नाटकाचा दिल्लीतील शुभारंभाचा प्रयोग नुकताच हाऊसफुल्ल पार पडला. निर्माते मनोहर जगताप (CEO, आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज) आणि कार्यकारी निर्माते निखिल जाधव यांच्या दूरदृष्टीमुळे या नाटकाला भक्कम कलाकारांची जोड मिळाली आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासोबतच नेहा जोशी, चरण जाधव, अनुष्का बोऱ्हाडे, अभिजीत झुंजारराव हे कसलेले कलाकार या नाटकात मुख्य भूमिका साकारत आहेत.
नाटकाचे दिग्दर्शन अभिजीत झुंजारराव यांनी केलंय. संगीत आशुतोष वाघमारे, नेपथ्य सुमीत पाटील, प्रकाशयोजना श्याम चव्हाण, रंगभूषा शरद सावंत आणि वेशभूषा तृप्ती झुंजारराव यांची आहे.
सयाजी शिंदेंकडून दहा प्रयोगाचे मानधन
दिल्लीतील प्रयोगातून जमा होणारे सर्व उत्पन्न पूरग्रस्त लोकांना मदत म्हणून दिले जाईल, अशी माहिती कार्यकारी निर्माते निखिल जाधव यांनी दिली. या सामाजिक कार्यात सक्रीय सहभाग घेत, अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यांनी सुमुख चित्र प्रोडक्शनसाठी सखाराम बाइंडरचे पुढील दहा प्रयोग केवळ एक रुपया मानधन घेऊन करण्याची घोषणा केली आहे. त्यांची उर्वरित मानधनाची संपूर्ण रक्कमही महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना दिली जाईल. (‘Sakharam Binder’ theatre artists provide assistance to flood victims)
अभिनेते सयाजी शिंदे केवळ एक रुपया मानधनावर हे विशेष प्रयोग करत आहेत. कला आणि माणुसकीच्या या अनोख्या संगमाचे साक्षीदार होण्यासाठी पुढील प्रयोगांना अवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कलाकार आणि निर्मात्यांनी घेतलेला हा निर्णय निश्चितच इतरांना प्रेरणा देणारा असून, आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज आणि सुमुख चित्र यांनी अभिनयाच्या माध्यमातून समाजाप्रती आपले उत्तरदायित्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.